जळगाव : जिल्ह्यात एप्रिल हिटची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून मध्यंतरी ढगाळ व बेमोसमी पावसाच्या वातावरणामुळे काही प्रमाणात कमी झाली होती. एप्रिलच्या चौथ्या टप्प्यात सुरूवातीपासूनच तप्त उन्हाची तीव्रता जाणवत आहे. मान्सून सुरू होण्यास अजून दिड ते दोन महिन्याचा अवधी शिल्लक असून सद्यस्थितीत अन्य तालुकास्तरावर विहिरी व जलाशयांची पाणीपातळी खालावली आहे. आजमितीस 61 गावांसाठी 81 टँकरव्दारे ग्रामीण भागात टंचाई निवारणासाठी पाणीपुरवठा केला जात असून आगामी काळात लवकरच टॅकरवारी शंभरी पार करण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात तीन मोठ्या प्रकल्पांसह लघू मध्यम प्रकल्प गेल्या तीनचार वर्षापासून मान्सून काळात सरासरीपेक्षा दिडपट पर्जन्यमानामुळे ओव्हरफ्लो झाले होते. परंतु जिल्ह्यात गेल्या मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान तसेच गिरणा पाणलोट क्षेत्रातदेखील पाण्याची आवक कमी असल्याने गिरणा प्रकल्पात मान्सूनअखेर केवळ 57 टक्के पाणीसाठा झाला होता.
तर सद्यस्थितीत चाळीसगाव, भडगाव, पाचोरासह अन्य तालुक्यांसाठी गिरणा प्रकल्पातून आतापर्यंत तीन आवर्तने सोडण्यात आली असून अजून एक आवर्तन शिल्लक आहे. ते देखील अक्षयतृतीया किवा 10 ते 15 मे दरम्यान सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गिरणा प्रकल्पात कमी जलसाठा शिल्लक राहणार असून जुलै ऑगस्टपर्यंत पुरवावा लागणार आहे.
असा आहे धरणातील पाणीसाठा
मोठया प्रकल्पांपैकी गिरणा 22.52, हतनूर 50.20, वाघूर 71.13 टक्क्यांवर आहे. जिल्हयातील 96 मध्यम लघू प्रकल्पांपैकी सुकी, अभोरा, तोंडापूर, मंगरूळ, मोर, गुळ आदी लघू प्रकल्प 50 टक्क्यांच्यावर तर बहुळा प्रकल्पात 22.17 टक्के असा जलसाठा आहे. तसेच अंजनी 8.48, हिवरा 4.18 हे प्रकल्प दहा टक्क्यांच्याही आत आहेत. तर मन्याड, अग्नावती, भोकरबारी आणि बोरी प्रकल्पात शून्य टक्के असा साठा आहे. जिल्ह्यातील लघू मध्यम प्रकल्पात सरासरी 35.32 टक्के उपयुक्त जलसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी 581.59 दलघमी म्हणजेच 40.74 टक्के जलसाठा होता.
चाळीसगाव 32 गावांसाठी 35 टँकर
चाळीसगाव- विसापूर तांडा, अंधारी, करजगाव, कृष्णानगर, हातगाव, हिरापूर, तमगव्हाण, रोहिणी, राजदेहरे, ब्राम्हणशेवगे, घोडेगाव, हातगाव भिल्लवस्ती, पिंप्री बु,प्र.दे. खराडी, डोण दिगर, तळेगाव, न्हावे, ढोमणे, पिंपळगाव, माळशेवगे, शिंदी, चत्रभूज तांडा, शेवरी, बिलाखेड, शिरसगाव, जुनपाणी, पिंपळवाड निकुंभ, तळोदे प्र.दे., चिंचगव्हाण, अभोणे तांडा, सुंदरनगर, नाईकनगर तांडा 1,
भडगाव तालुक्यात तळबंद तांडा, वसंतवाडी, आंचळगाव.
अमळनेर तालुक्यात तळवाडे, शिरसाळे बु., निसर्डी, लोण पंचम, नगाव खु., बु, देवगाव देवळी, सबगव्हाण, भरवस, अंचलवाडी, आटाळे, पिंपळे खु., चिमणपुरी, डांगर बु, आर्डी अनोरे, लोण बु, गलवाडे बु, लोणचारम तांडा.
पारोळा तालुक्यात खेडीढोक, हनुमंतखेडे.
जळगाव तालुक्यात वराड, लोणवाडी बु, सुभाषवाडी शिरसोली.
जामनेर तालुक्यात रोटवद, मोरगाव आणि भुसावळ तालुक्यात कंडारी असे 61 गावांसाठी 81 टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे.
या गावांमध्ये विहिर अधिग्रहित कंसात विहिरी
चाळीसगाव 38(47)जामनेर 5(5), धरणगाव 110 गावे (11), एरंडोल6(7), भुसावळ आणि भडगाव प्रत्येकी 2(2), रावेर आणि बोदवड प्रत्येकी 1(1),मुक्ताईनगर 4(4), पाचोरा 3(3), अमळनेर 31(37), पारोळा 5(5), चोपडा 3(6) अशा 111 गावांसाठी 131 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली,
कोट
अल्प पावसामुळे पाणी पिण्यासाठीच आरक्ष्ाित
गत मान्सूनमध्ये सप्टेंबर 2023 पूर्वी गिरणा प्रकल्पात केवळ 57 होउ शकला. त्यामुळे यावर्षी गिरणा प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षीत करण्यात आले आहे. एप्रिलच्या पहिल्या दुसऱ्या सप्ताहातच गिरणा प्रकल्पातून चाळीसगाव, भडगाव, पाचोऱ्यासह अन्य तालुक्यांसाठी तिसरे आवर्तन सोडण्यात आले होते. तर हतनूर प्रकल्पातून भुसावळसह अन्य गावांसाठी नुकतेच आवर्तन सोडण्यात आले होते. सद्यस्थितीत उन्हाच्या तीव्रतेमुळे व बाष्पीभवन प्रक्रीयेमुळे जिल्ह्यातील प्रकल्पांची पाणीपातळी यावर्षी झपाटयाने खालावत आहे.
– डी.डी.अग्रवाल,
कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग जळगाव.