काँग्रेसच्या पराभवानंतर ‘माविआ’तच जुंपली; संजय राऊतांच्या खोचक टीकेवर काँग्रेसकडून प्रतिउत्तर

हरियाना विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर  पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान पराभूत झालेला काँग्रेस पक्ष सध्या विरोधकांसह मित्र पक्ष्यांच्या टीकेचे केंद्रबिंदू बनला आहे. काँग्रेसच्या पराभवानंतर शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या थेट टीकेनंतरही काँग्रेसच्या नेत्यांना विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. या विषयावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी राऊतांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले संजय राऊत ?
“काँग्रेसला वाटलं आम्ही एकतर्फी जिंकू. आम्हाला कोणाची गरज नाही. जिथे काँग्रेस कमजोर असते, तिथे ते प्रादेशिक पक्षाची मदत घेतात. जिथे काँग्रेसला वाटतं आपण मजबूत आहोत, तिथे ते स्थानिक पक्ष, इतरांना महत्त्व देत नाहीत. या सगळ्याचा परिणाम हरियाणासारख्या निकालात दिसतो. हरियाणाचा पराभव दुर्देवी आहे. यातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. देशातील निवडणूक एकत्र लढवावी लागेल. कोणी स्वत:ला छोटा भाऊ, मोठा भाऊ समजू नये. लोकसभेच यश हे इंडिया आघाडीच यश आहे” असं राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

‘सामना’तूनही काँग्रेसवर टीका
हरयाणा आणि जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजप-काँग्रेससाठी धक्कादायक आहेत. हरयाणात पुन्हा भाजपचे सरकार येईल असे कुणीच ठामपणे म्हणत नव्हते. काँग्रेसचा विजय एकतर्फी होईल असे एकंदरीत वातावरण होते; पण जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर कसे करायचे हे काँग्रेसकडूनच शिकावे लागेल. हरयाणात भाजपविरोधी वातावरण होते. तरीही हरयाणाचे निकाल काँग्रेसच्या विरोधात गेले, अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.

संजय राऊतांच्या टीकेवर नाना पटोलेंची प्रतिक्रिय
संजय राऊत काय लिहितो काय बोलतो याला आम्ही जास्त महत्त्व देत नाही. हरियाणा आणि महाराष्ट्रातील ज्यांना फरक कळत नाही त्यांच्या बद्दल काय बोलणार. मी त्यावरती जास्त काही बोलणार नाही, वेळ आल्यावर योग्य ते उत्तर देऊ. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं समजून चला. महायुतीकडे जास्त लक्ष द्या, असे प्रत्युत्तर नाना पटोले यांनी राऊतांना दिले.