---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. यातच नुकताच अमळनेर शहरातील कसाली मोहल्ल्यात ११ वर्षाच्या बालकाला डेंग्यूची लागण झाल्याचे उघड झाले आहे. तसेच पुणे येथून आलेला एक विद्यार्थ्याला डेंग्यूने लागण झाली आहे. यावर उपाययोजना करीत डेंग्यूची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी ड्राय-डे पाळण्याचे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
पावसाळा सुरु झाला की डासांची उत्पत्ती वाढते. यामुळे डेंग्यूच्या रुग्णांची वाढ होत असते. यापूर्वी तालुक्यातील धार येथे वा धुळे रोडवरील सर्वज्ञ नगर, न्यू प्लॉट, भांडारकर कंपाऊंड, विद्याविहार या ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. ते बरे झाले आहेत. परंतु, पुन्हा २ रुग्ण आवाळून आले आहेत. यात एक कसाली मोहल्ल्यातील साद शेख तौसिफ (वय ११) तर पुण्याला शिकणारा सुभेद सराफ याला ही डेंग्यूची लागण झाली असून तो उपचारासाठी अमळनेर येथे आला आहे.
दरम्यान, डेंग्यू आजाराच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सर्वत्र धुरळणी आणि फवारणी केली जात आहे. तर पालिका रुग्णालयातर्फे घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे. डासांची उत्पत्ती थांबवून नागरिकांनी ड्राय डे पाळण्याचे नगरपालिकेचे आवाहन डेंग्यूची साखळी खंडित करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
शहरात सर्वेक्षण
अमळनेरात ४ पथके सर्वेक्षणाचे काम करत आहेत. यात पर्यवेक्षक किशोर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सरला महाजन, गढरे, सरिता परदेशी, फाल्गुनी भावसार, विजय दासनुर, मंदा चौधरी, उल्हास माकडे, जयश्री बारी यांची चार पथके सर्वेक्षण करत
दरम्यान, नागरिकांनी कोरडा दिवस पाळल्यास डेंग्यू नियंत्रित होईल. तर स्वच्छता ही पाळावी. तसेच रस्त्यावरील घाणीबाबत तत्काळ नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाला कळवावे असे आवाहन मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी केले आहे.
शहरातील प्रत्येक भागात आरोग्य सहाय्यक, परिचारिका यांच्या मार्फत सर्वेक्षण सुरु आहे. डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी नियमित धुरळणी, फवारणी केली जात आहे. एक डास अनेकांना चावू शकतो, नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी.नागरिकांच्या घरातील भांडे, फ्रीज, टायर, खुल्या जागेतील नारळाच्या करवंट्या, तुटलेले प्लास्टिक भांडे यातील डेंग्यूच्या डासांच्या अळ्या नष्ट केल्या जात आहेत. विहिर किंवा वापराच्या पाण्याच्या स्रोतामध्ये गप्पी मासे, उपडद्यावरील डबक्यात अबेट आणि घाण पाण्यात ऑइल टाकले जात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन यांनी दिली आहे.