धुळे : येथील सुभाष नगर परिसरात धक्कादायक दुर्घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. धुळे मनपाच्या घंटागाडीने दीड वर्षाच्या चिमुकल्याला चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली असून या अपघातात त्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू ओढवला आहे. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी या दुर्घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे शहरातील सुभाष नगर परिसरात बर्फ कारखाना रस्त्यावर हि दुर्घटना सकाळच्या सुमारास घडली. शौर्या बडगुजर असे घटनेत मृत झालेल्या बालकाचे नाव आहे. दरम्यान, महापालिकेने कचरा संकलनाचा मक्ता दिला आहे. यानुसार शहरातील विविध भागात घंटा गाड्या या कचरा संकलित करण्यासाठी फिरत असतात.
अशीच एक घंटागाडी कचरा संकलन गाडी बर्फ कारखाना रस्त्यावर आली. या घंटागाडीने खेळत असलेल्या चिमुकल्याला जोरदार धडक दिली. या धडकेत मुलाला गंभीर दुखापत झाली होती. घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी शौर्या यास लागलीच रुग्णालयात दाखल केले. मात्र या दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. यावेळी त्याच्या आई- वडिलांनी एकच आक्रोश केला.
वाहन चालकाला पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, जूने धुळे परिसरातील नागरिक आणि चिमुकल्याच्या कुटुंबीयांनी एकच संताप व्यक्त केला आहे, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी तत्काळ वाहन चालकाला अटक केली आहे. या आपघात प्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून चिमुकल्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.