धुळे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध भागात विविध कारवाई करण्यात येत आहे. याच प्रमाणे नेर शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारु तयार करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत २५ लाख २२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत जिल्हा परिषदेच्या महिला सदस्यासह तिघांनी घटनास्थळावरून पोबारा केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे देण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला नेर शिवारात बनावट दारु तयार करण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक स्वाती काकडे यांच्या समवेत पथकाने महालकाळी नेर शिवारात गायत्रीदेवी संजय जयस्वाल यांच्या शेतात छापा टाकला. या छाप्यात शेतात देशी दारू निर्मितीचा कारखाना सुरू असल्याचे आढळून आले. त्या ठिकाणी बनावट देशी दारूसह एकूण २५ लाख २२ हजार १०० रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या घटना स्थळावरून जिल्हा परिषदेच्या सदस्य गायत्रीदेवी संजय जयस्वाल, सुमित उर्फ गणेश संजय जयस्वाल आणि स्वप्नील उर्फ लाला संजय जयस्वाल हे पळून गेल्याची माहिती देखील राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे देण्यात आली आहे.
ही कारवाई परळी पथकाचे निरीक्षक डी.एल. दिंडकर , आर. आर. धनवटे, लीलाधर पाटील, दुय्यम निरीक्षक सचिन शिंदे, सौरभ आवटे, पी. बी. अहिरराव, शुभांगी मोरे, सागर नलावडे, रियाज शेख, ए. बी. निकुंबे, जितेंद्र फुलपगारे, जवान धुळेकर, आण्णा बहिरम, वाहन चालक विजय नाहीदे, श्रीमती बी. पाटील यांच्या पथकाने केली