---Advertisement---
Dhule News : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील लळिंग गावानजीक पेट्रोलपंपाजवळ शुक्रवारी (30 मे) पहाटे सुमारे 24 लाखांचा 10 प्लास्टिक गोण्यांत तब्बल 181 किलोपेक्षा अधिक अफूचा साठा बनावट नंबरप्लेट असलेल्या कारमध्ये वाहतूक करताना चालक पोलिसांच्या जाळ्यात अडकला. मात्र, त्याचा साथीदार फरार झाला. याप्रकरणी मोहाडीनगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, मोहाडीनगर पोलीस ठाण्याचे हवालदार सचिन वाघ, पोलीस शिपाई चेतन झोळेकर, चालक मंगल पवार यांचे पथक शासकीय वाहनातून (एमएच 18, बीआर 5410) गुरुवारी (29 मे) रात्री अकरा ते शुक्रवारी (30 मे) पहाटे पाचदरम्यान रात्रगस्त घालत असताना, पहाटे पाचच्या सुमारास मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर लळिंग गावानजीकच्या इंडियन ऑइल पेट्रोलपंपाजवळ कारवर (एमएच 12, डीवाय 5920) संशय बळावला.
कारचालकाला पोलीस पथकाने थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने कार न थांबविता एमएच-18 ढाब्यापासून यू टर्न घेत धुळ्याच्या दिशेने भरधाव नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कारचा पाठला करीत इंडियन ऑइल पेट्रोलपंपाजवळील समांतर रस्त्यावर कार थांबविली. कारचालक अंधाराचा फायदा घेत लळिंग गावाकडे पळत असताना, त्याला लळिंग घाटात पथकाच्या हाती लागला. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच, त्याने रमेश भवराराम बिष्णोई (वय 33, रा. हेमनगर, जोलीअली, ता. जि. जोधपूर, राजस्थान) असे नाव सांगत, फरार झालेल्याचे नाव महेश साहू (रा. खोखरिया, ता. जि. जोधपूर, राजस्थान) असे असल्याचे सांगितले.
कारच्या तपासणीत तब्बल 24 लाख सात हजार 530 रुपये किमतीचा 181.306 किलोग्रॅम अफूच्या झाडांच्या फुटलेल्या फळाच्या सुकलेल्या टरफल्यांचा चुरा 10 प्लास्टिक गोण्यांमध्ये मिळून आला. पोलिसांनी रमेश बिष्णोई याला अटक केली असून, हवालदार सचिन वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहाडीनगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक अशोक पायमोडे तपास करीत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, धुळे शहर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, मोहाडीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शशिकांत श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकातील उपनिरीक्षक अशोक पायमोडे, हवालदार पंकज चव्हाण, संदीप कदम, पोलीस शिपाई मुकेश मोरे, प्रकाश जाधव, मनीष सोनगिरे यांनी केली.