राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मिळणारे धक्कातंत्र काही थांबता थांबत नाही. माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर यांच्यापाठोपाठ आता पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी मंगळवारी (२७ मे) शरद पवारांची साथ सोडत ‘कमळ’ हाती घेतले. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
मंगळवारी (२७ मे) मुंबईतील भाजपच्या मुख्यालयात प्रवेश सोहळा झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ, माजी नगराध्यक्ष संजय वाघ, माजी खासदार ॲड. वसंतराव मोरे यांचे पुत्र पराग वसंतराव मोरे, रोहन मोरे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नानाभाऊ महाजन यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रवी चव्हाण, राम शिंदे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ आणि त्यांच्या परिवाराचे अनेक वर्षांपासून शरद पवारांसह अजित पवारांसोबत
राजकीय संबंध आहेत. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने त्यांना उमेदवारी नाकारली.
त्यामुळे शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्षे काम करणारे दिलीप वाघ हे समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही वाघ यांनी भेट घेतली. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे, असे राजकीय वर्तुळात चर्चितचर्वणही होत होते. आता दिलीप वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पाचोरा-भडगाव मतदारसंघातील राजकारणाची समीकरणे बदलतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमधून जिल्ह्यातील नेते, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांच्या गटात दाखल झाले. त्यानंतर शरद पवार यांनी पक्षाची पुन्हा उभारणी सुरू केली. मात्र, शरद पवारांच्या पक्षाला बसणारे धक्के थांबता थांबत नाहीयेत. आता माजी आमदार वाघ यांच्यासह माजी खासदार ॲड. वसंतराव मोरे यांचे पुत्र पराग मोरे, तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नानासाहेब महाजन यांनी भाजपप्रवेश केल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे
दिलीप वाघ यांचा राजकीय वारसा
दिलीप वाघ यांना राजकीय वारसा असून, त्यांचे वडील ओंकारआप्पा वाघ हे १९६७ ते १९९९ अशी तीन दशके आलटून-पालटून पाचोऱ्यातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी नंतर शरद पवारांची साथ धरली. त्यांचे पुत्र दिलीप वाघ हे शरद पवारांचे समर्थक होते. त्यांना मानणारा मोठा वर्ग पाचोरा-भडगाव मतदारसंघात आहे. त्यांच्या कुटुंबाकडे पीटीसीसारखी मोठी संस्थाही आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही त्यांचे समर्थक आहेत.
- भारताला महासत्ता बनवण्याच्या दिशेने केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासयात्रेत सहभागी होण्यासाठी अनेक ताकदवान राजकीय व सामाजिक कार्यकर्ते उत्सुक आहेत. आमचे नेते गिरीश महाजन यांच्यावर विश्वास व्यक्त करणाऱ्या इलेक्टिव्ह मेरीटच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे जळगाव भाजपमध्ये स्वागतच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये भाजपची ताकद वाढलेली दिसावी, या दृष्टीने गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनात आमची वाटचाल अशीच सुरू राहील.
डॉ. राधेश्याम चौधरी, जिल्हाध्यक्ष, जळगाव भाजप