जळगाव : आगामी काळात येणाऱ्या सर्व धर्मांच्या सणांच्या संदर्भात आज जिल्हास्तरीय शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी उपस्थित होते.
जळगाव पोलीस दलाच्या वतीने मंगळवारी २५ मार्च रोजी जळगावातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात जिल्हास्तरीय शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. आगामी सण व उत्सव जिल्हावासीयांनी शांततेत आणि आनंदात साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना सण-उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले. तसेच, शांतता कमिटीच्या सदस्यांनी आपल्या परिसरातील घडामोडींवर लक्ष ठेवून पोलिसांना वेळेवर माहिती देत सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले. तर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका, तसेच कुणी आक्षेपार्ह मजकूर पसरवत असल्यास तत्काळ पोलिसांना कळवा. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे सांगितले.
या बैठकीत हिंदू, मुस्लिम, बौद्ध आणि इतर समाज बांधवांसह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. बैठकीत घेतलेल्या निर्णयांनुसार, आगामी सण आणि उत्सवांच्या काळात पोलीस प्रशासन अधिक सतर्क राहणार असून, कायदा-सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. समाजातील सर्व घटकांनी परस्पर सामंजस्याने आणि सलोख्यात हे सण साजरे करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
यावेळी उपस्थित असलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच सर्व धर्मीय समाज बांधव यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले.