‘जळगाव नागरिक मंच’च्या विशेष पुढाकाराने मल्टी मीडिया फीचर्स प्रा. लि. आयोजित ‘व्हिजन डॉक्यूमेंट’ चर्चासत्रात जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी आपल्या पूर्व अनुभवातून जिल्ह्यात कृषी क्षेत्रातील उपलब्ध संधी, संभाव्य धोके या सर्वांमधून आपली बलस्थाने शोधून आपला अभ्यासपूर्ण विवेचन उपस्थितांसमोर सोमवारी सादर केला.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन सभागृहात ५ मे रोजी ‘व्हिजन डॉक्युमेंट’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन गनी मेमन व सुशील श्यामसुंदर नवाल यांनी स्वागत केले. प्रास्ताविक गनी मेमन यांनी तर सूत्रसंचालन सुशील नवाल यांनी केले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील कृषी व उद्योग क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांसह मॅनेजमेंटचे विद्यार्थीसुद्धा उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या साथीने व सर्वसामान्यांच्या सोबतीने विविध क्षेत्रांचा अभ्यास करुन जिल्ह्याचा ‘विकास आराखडा’ तयार केला आहे. ज्यामध्ये कृषी, उद्योग-व्यापार, सहकार, सेवा व पर्यटन आदी विविध विषयांचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अभ्यासूपर्ण सादरीकरणानंतर उपस्थितांसमवेत प्रश्नोत्तराचा सत्र रंगला. आपल्या जळगाव जिल्ह्याची प्रगती व उन्नतीच्या प्रवासात जिल्ह्यातील नागरिकांचे विचार व योगदान अत्यंत महत्त्वाचे असून कार्यक्रम सर्वांसाठी खुले आहे.
दुसरे सत्र पुढील आठवड्यात एमआयडीसीत
‘व्हिजन डॉक्युमेंट’ या शृंखलेचे दुसरे सत्र पुढील आठवड्यात एमआयडीसीत आयोजित केले जाणार आहे. त्यामध्ये ‘उद्योग व व्यापार’ या विषयावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आपले सादरीकरण करणार आहेत. जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टिकोनातून आयोजित या विकासाभिमुख चर्चासत्राचा लाभ नागरिकांनी अवश्य घ्यावा व या विचार श्रृंखलेत आपले सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.