जळगाव : शहरातील १०० कोर्टीच्या रस्त्यांवरून घोळ सुरू असतानाच, आता रस्त्यांच्या मंजूर कामाच्या फाइलमधून चक्क आवश्यक कागदपत्रे गहाळ झाल्याचा आरोप आणि संताप व्यक्त करीत महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती नितीन बरडे यांनी सोमवारी सायंकाळी महापालिकेत येत बांधकाम विभागात संबंधित कर्मचाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करीत त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी मंजूर केला. त्यानंतर शहरातील रस्त्यांची कामे सुरू झाले. या ना त्या कारणांवरून महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावरही आला. आता रस्त्यांच्या मंजूर कामाच्या फाइलमधून चक्क आवश्यक कागदपत्रे गहाळ झाल्याचा आरोप महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती नितीन बरडे यांनी करीत प्रशासनावर रोष व्यक्त केला. निविदाप्रक्रिया पूर्ण झालेली असताना महापालिकेच्या बांधकाम विभागातील कार्यालयातून फाइल गहाळ कशी होते, असा प्रश्न उपस्थित करीत बरडे यांनी संताप व्यक्त केला. मक्तेदार स्वतः फाइल फिरवीत असताना तो ती फाइल गहाळ कसा करेल, असा जाब विचारत बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. बोगस केलेल्या कामांच्या फाइल्स तुम्ही गायब करतात, असा गंभीर आरोपही बरडे यांनी केला.
शहरातील जोशीपेठ परिसरातील रस्त्याबाबतची फाईल गहाळ झाली असून, याबाबत चंद्रकांत अत्तरदे यांनी तक्रार केली असल्याचीही आठवण या वेळी बरडे यांनी करून दिली. चार महिन्यांपासून फाइल या मजल्यावर आहे, त्या मजल्यावर आहे, असे उत्तर दिले जात आहे. ही फाइल कुठे आहे. याचा तपास करण्यासाठी मला स्वतः यावे लागले, असेही कर्मचाऱ्यांना सांगत बरडे यांनी स्पष्ट केले. ही फाईल तत्कालीन शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे यांच्याकडे असल्याचे कर्मचाऱ्याकडून सांगण्यात आले. यावर बरडे यांनी निविदाप्रक्रिया झाल्यानंतर ही फाइल सोनगिरे यांचा संबंध काय, अशी विचारणा केली. तुम्ही हे मुद्दामहून केले असून, उद्या आपण याची तक्रार आयुक्तांकडे करू, असा दमही बरडे यांनी भरला.
प्रभाग क्रमांक १२ मधील पाटीलवाडी, मायादेवीनगर परिसरातील रस्त्यांची निविदाप्रक्रिया राबवून दोन ते तीन महिने झाले. ती मंजूरही झाली आहे. ही निविदा ३६ लाखांची असून, म क्तेदाराला हे काम मिळू नये यासाठी बांधकाम विभागात षडयंत्र रचले जात असल्याचा आरोपही बरडे यांनी करीत बांधकाम विभागातील कर्मचारी हे त्या मक्त्त्याच्या फाइलम धील कागदपत्रे गहाळ करीत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. हे कसे झाले, याचा जाब विचारत त्यांनी थेट कर्मचाऱ्याला फैलावर घेतले. बरडे यांनी फाइल गहाळ झाल्याबद्दल विचारणा केली असता, कर्मचाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
बरडेंची कर्मचाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती
मला त्या कामांची वर्कऑर्डर पाहिजे, तुम्ही दुसऱ्यांदा ती फाइल गायब केली आहे. येथे बिनकामाचे अधिकारी बसविले आहेत का? तुम्ही फक्त ठेकेदारांकडून पैसे घेतात. ठेकेदारांच्या माणसांना का फिरवतात? माझी फाइल गेली कुठे? ठेकेदारांची माणसं येथे गडबड करायला ठेवता का तुम्ही? सर्व फाइल्समागून टक्केवारी घेत आहात का? तीन महिन्यांपासून मला फिरवीत आहेत. निविदाप्रक्रिया झाल्यानंतर फाइलमधून कागदपत्रे कशी गायब होत आहेत? अशी प्रश्नांची सरबत्ती बरडे यांनी मनपा कर्मचाऱ्यांवर केली.