Dog Attack News: पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील 50 वर्षीय महिला आणि जळगाव शहरातील एका चार वर्षीय बालक ठार झाल्याची गंभीर घटना रविवारी घडली. या घटनेमुळे नागरिकांमधून ग्रामपंचायत आणि महापालिका प्रशासनाविरूध्द तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
याबाबत माहिती अशी की, रविवारी (1 जून) सकाळी चारा आणण्यासाठी शेतात गेलेल्या महिलेला पिसाळलेल्या कुत्र्यांनी हल्ला करीत ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या आठवडाभरातील ही दुसरी प्राणघातक घटना आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. अरुणाबाई बालू भिल (वय 50) असे मृत महिलेचे नाव आहे.
जळगावात चार वर्षीय बालकाचे तोडले लचके
जळगाव शहरात देखिल नागेश्वर कॉलनी भागात राहणारे सचिन गायकवाड यांचा मुलगा अरविंद सचिन गायकवाड (वय 4 वर्षे) हा अंगणात खेळत असतांना अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याने अरविंदच्या मानेचे लचके तोडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अरविंद गायकवाड या बालकाचा करूण अंत झाला. या घटनेमुळे जळगावातील नागेश्वर कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच महापालिका प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यासंदर्भात कुठलीही कारवाई होत नसल्याने तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
दरम्यान, मोकाट कुत्र्याच्या समस्येबाबत जळगाव मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना प्रश्न केला असता, पिसाळलेल्या कुत्र्यांना मारण्याचा प्रशासनाला अधिकार नाही. केवळ निर्बिजीकरण करणे हाच एक उपाय आहे. प्रशासनाने याबाबत निविदा देखिल मागविल्या आहेत. प्रक्रिया झाल्यानंतर कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जाईल, असे ते म्हणाले.