---Advertisement---
ईडीने जप्त केलेला चित्रपटगृहाचा भूखंड १५ कोटी रुपयांना विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी ड्रग्ज तस्कर इक्बाल मिर्चीच्या एका सहकाऱ्याला अटक केली आहे. आरोपी अब्दुल कादिर अली मोहम्मद (७५) याला बुधवारी दक्षिण मुंबईतील व्हीपी रोड पोलिसांनी अटक केली, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.
गिरगावमधील इक्बाल मिर्चीशी संबंधित असलेले न्यू रोशन टॉकीज थिएटर २०२० मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केले होते. अब्दुल कादिर अली मोहम्मदने चित्रपटगृह पाडून भूखंड विकण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात ईडीच्या कर्मचाऱ्यांनी अलीकडेच तक्रार दाखल केली होती, असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर अब्दुलविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या संबंधित कलमांखाली फसवणूक, अतिक्रमण आणि गैरव्यवहाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. जप्ती असूनही, अब्दुलने गत वर्षी चित्रपटगृह पाडले व आपली मालकी असल्याचा दावा केला. त्याने मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील एका व्यावसायिकाला १५ कोटी रुपयांना हा भूखंड विकण्याचा करार केला आणि काही रक्कम घेतली, असे ते म्हणाले.