आगामी शैक्षणिक वर्षांत शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या तपासणीसह विद्यार्थी पटसंख्येची तपासणी, असे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी व प्रशासन अधिकाऱ्यांनी किमान १०० प्राथमिक शाळांना नियमित भेटी द्याव्यात. तेथील शाळेची पटसंख्या तपासणीचा अहवाल तातडीने पाठवावा, असेही निर्देश शिक्षण संचालक गोसावी यांनी दिले आहेत.
शाळा भेटीचे नियोजन करा
नवीन शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी जिल्हास्तरावरील सर्व विभागातील शासकीय यंत्रणेचे वर्ग-१ व वर्ग-२ चे अधिकारी यांनी जिल्ह्यात किमान १०० प्राथमिक शाळांना भेटी देण्याचे नियोजन करावे आणि ते राज्यस्तरावर पाठवावे. भौतिक सुविधांसह अन्य साहित्याची उपलब्धतेची पाहणी जिल्हा परिषदेच्या शाळांतील प्राथमिक स्तरावरील विद्यार्थी गुणवत्ता व शाळेच्या भौतिक सुविधा यांचा आढावा घ्यावा. त्यात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे आवश्यक असत्याचेही निर्देश शिक्षण संचालकांनी दिले आहेत.
जि. प. शाळा पटसंख्या नोंदणी
आगामी २०२५-२६ या शैक्षणिक सत्रांतर्गत स्थानिक स्तरावर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची १०० टक्के पट नोंदणीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या पहिलीच्या वर्गातील पटसंख्येत लक्षणीय वाढ करण्यासाठी शाळेलगतच्या अंगणवाडी, बालवाडी यांना शिक्षकांनी नियमित भेट देऊन त्यात पहिलीमध्ये प्रवेशित योग्य मुलांची यादी तयार करावी. प्राथमिक शिक्षकांनी बालवाडी अथवा अंगणवाडी सेविका तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांना भेटून १०० टक्के विद्यार्थी पहिल्या दिवशी शाळेत दाखल होण्यासाठी प्रयत्न करावेत.
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत २०२५-२६ च्या शैक्षणिक सत्राची सुरुवात १६ जून २०२५ रोजी होणार आहे. त्यासाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी स्थानिक स्तरावर लोकप्रतिनिधींसमवेत त्यांच्या मतदार संघात अथवा जवळच्या शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत पहिल्या दिवशी करावे. तसेच लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना एक संपर्क अधिकारी नेमून द्यावा, ते कोणत्या शाळेला भेट देणार, हे पूर्वनियोजन करून आवश्यक तयारीच्या सूचनाही शिक्षण संचालक गोसावी यांनी दिल्या आहेत.
अधिकाऱ्यांनो, दोन शाळा दत्तक घ्या…
शैक्षणिक क्षेत्रात शिक्षणाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांकडून शाळा दत्तक घेतल्या जातातः परंतु याव्यतिरिक्त शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पुन्हा किमान दोन शाळा शिक्षण विभागातील अधिकारी, डाएटचे प्राचार्य, माध्यमिक, प्राथमिक, योजना शिक्षणाधिकारी, ज्येष्ठ अधिव्याख्याता, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, अधीक्षक, विस्तार अधिकारी (शिक्षण) यांनी घ्याव्यात असे निर्देश केले आहेत.