Educational News : शिक्षकांच्या बदल्या एकाच वेळापत्रकनुसार, शासनाद्वारे वेळापत्रक जाहीर

जळगाव : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या आता एकाच वेळापत्रकानुसार होणार आहेत. यात ही प्रक्रिया  31 मेपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. या बदल्यांचे वेळापत्रकही शासनाद्वारे जारी करण्यात आले आहे. ऑनलाईन पोर्टलद्वारे शिक्षकांची बदली प्रकिया राबविण्यात येते. याबाबत न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान,  बदल्यां ऑनलाईन पोर्टलद्वारे राज्यभरासाठी एकाच वेळापत्रकानुसार करावे, असे आदेश दिले आहेत. यानुसार राज्यभर याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

अशी असेल शिक्षक बदली प्रक्रिया
बदली प्रक्रियेत प्रथम सर्वसाधारण संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण करुन शिक्षकांची संख्या निश्चित केली जाईल. यानंतर जिल्हा परिषदेत बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीकरिता पूर्वतयारी केली जाईल. अवघड क्षेत्रे निश्चित करत दरवर्षीच्या वेळापत्रकानुसार बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे. या वेळापत्रकाबाबत मोठी जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर असणार आहे. हे वेळापत्रक सर्व शिक्षकांची निदर्शनास आणून देण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर असणार आहे. पुणे येथील माहिती तंत्रज्ञान कंपनी पोर्टल सुरळीत ठेवण्याची जबाबदारी पार पाडणार आहे.  काही अपरिहार्य कारणास्तव बदली प्रक्रिया राबविणे शक्य नसल्यास व तसे शासनाने कळविल्यास त्या वर्षासाठी हे वेळापत्रक लागू असंणार नाही.

असे असणार शिक्षकांच्या बदलीचे वेळापत्रक…
दि. 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी बदलीपात्र शिक्षकांच्या याद्यांची प्रसिध्दी.
दि. 1 ते 31 मार्च उपलब्ध रिक्त जागांची निश्चिती.
दि. 1 ते 20 एप्रिल- बदलीसाठी आवश्यक माहिती जिल्हा परिषदेने कंपनीला देणे.
दि. 21 ते 27 एप्रिल – समानीकरणांतर्गत रिक्त पदे निश्चित करणे.
दि. 28 एप्रिल ते 3 मे – विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 मधील रिक्त जागा घोषित करणे.
दि. 4 ते 9 मे – विशेष संवर्ग भाग 2 मधील रिक्त जागा घोषित करणे.
दि. 10 ते 15 मे – बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे.
दि. 16 ते 21 मे बदलीपात्र शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे,
दि. 22 ते 27 मे विस्थापित शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे.
दि. 28 ते 31 मे – अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे.