Eknath Khadse : एकनाथ खडसे यांचा भाजपात जाण्याचा मार्ग मोकळा ? चर्चांना उधाण

एका दीर्घ काळानंतर पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. भाजपचे माजी नेते आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात असलेले खडसे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.

राजकीय समीकरणे बदलणार?

गेल्या सहा महिन्यांपासून खडसे यांच्या पुनर्प्रवेशाच्या चर्चा सतत सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. मात्र, अद्याप त्यांचा पक्षप्रवेश पूर्ण झालेला नाही. विशेष म्हणजे, यापूर्वी खडसे आणि फडणवीस यांच्यात राजकीय संघर्ष चांगलाच रंगला होता, त्यामुळेच हा प्रवेश रखडल्याचे बोलले जात होते. मात्र, काल रात्री फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी ‘सागर’ येथे झालेल्या भेटीनंतर हा संघर्ष मिटण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. जवळपास पाऊणतास दोघांमध्ये चर्चा झाली असून, खडसे यांचा भाजप प्रवेश आता सोपा होईल, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा :  मुलीशी अनैतिक संबंध, घरी बोलावून बापाने विवाहित प्रियकराला संपवलं; घटनेमुळे परिसरात खळबळ

खडसेंनी काय प्रतिक्रिया दिली?

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना खडसे यांनी मात्र राजकीय चर्चेचे वृत्त फेटाळले. ते म्हणाले, “मी केवळ माझ्या मतदारसंघातील विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. त्यामध्ये सहकारी तत्त्वावरील सूतगिरणी, मुक्ताई मंदिराच्या कामांसंदर्भातील विषय होते. तसेच, काही इंजिनिअरिंग कॉलेजच्या कामांबाबतही चर्चा झाली. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना पत्रही दिले आहे. पक्षप्रवेशाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.”

पुढील राजकीय समीकरणे

या भेटीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असून, खडसे यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भाजपमध्ये पुनर्प्रवेश झाला, तर उत्तरे महाराष्ट्रातील राजकारणात मोठे परिवर्तन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या घडामोडी अधिक स्पष्ट होतील.