मुक्ताईनगर शहरातील बोदवड रोड लगत असलेल्या सेंट्रल बँकेच्या शाखेतून एका शेतकरी वृद्ध महिलेचे कापडी पिशवीतून ८५ हजार रुपये लांबविल्याची घटना सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.
मुक्ताईनगर तालुक्यातील ६२ वर्षीय शेतकरी महिला बेबाबाई प्रभाकर काळे यांनी त्यांच्या शेतातील तूर एका व्यापाऱ्याला विकली. त्या मोबदल्यात मिळालेले ८५ हजार रुपये मुक्ताईनगर येथील सेंट्रल बँकेत जमा करण्यासाठी त्या व त्यांचा मुलगा सुधाकर हे दोघेही आले होते. वृद्ध शेतकरी महिला बँकेत पैसे जमा करण्यासाठी एका हिरव्या रंगाच्या कापडी पिशवीत रक्कम घेऊन रांगेत उभ्या होत्या. ज्यावेळेस बँकेत रक्कम भरण्याची वेळ आली तेव्हा त्या महिलेने पिशवीत पाहिले असता पिशवी खालून कापून त्यातून पैसे लंपास केल्याचे आढळून आले.
वृद्ध महिलेने कष्टातून कमविलेली रक्कम अचानक चोरीस गेल्याने महिलेला मोठा धक्का बसला नंतर त्यांच्या मुलाच्या मदतीने शोधू लागल्या. परंतु ती रक्कम कुठेही आढळून आली नाही. यापूर्वी सुद्धा बँकेतून रक्कम चोरी जाण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. आरोपी सीसीटीव्ही कॅमेरा दिसत असून सुद्धा बऱ्याचदा चोरी गेलेल्या रक्कम परत मिळू शकलेली नाही. बेबाबाई प्रभाकर काळे यांनी थेट पोलिसात धाव घेतली व त्या ठिकाणी त्यांनी फिर्याद नोंदवली.
या फिर्यादनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान या ठिकाणी पोलीस अधिकारी यांनी सुद्धा तात्काळ घटनास्थळी धाव घेत सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक यांच्याशी चर्चा केली तसेच सुरक्षा यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले.