जळगाव, दीपक महाले : नुकतीच दिवाळी आटोपली. दिवाळीचे फटाके वाजले काय ना वाजले काय? त्यांचं कौतुक घटिका दोन घटिकांचं. मात्र याच धामधुमीत राजकीय फटाकेही जोमात वाजू लागले आहेत. प्रचाराचा धुरळा उडतोय. राज्य विधानसभेच्या या निवडणुकीत प्रत्येक उमेदवार जिंकण्याच्या इर्षेने आखाड्यात उतरला आहे. अशातच जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक आखाड्यात शिवसेना विभाजित झाल्यानंतर शिंदे गटातील मोठ्या नेत्यांमध्ये ओळखले जाणारे मंत्री गुलाबराव पाटील हे पुन्हा एकदा उतरले आहेत. त्यांच्याविरोधात पारंपरिक प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे तगडे आव्हान आहे.
दोन गुलाबरावांमध्ये ‘काट्या’ची लढत होणार असली, तरी दोघांकडून प्रचारातून आरोप-प्रत्यारोपांचे फटाके फुटत आहेत. हमखास मंत्रिपद देणारा मतदारसंघ म्हणून सध्या ओळख असलेल्या या मतदारसंघातून दोघांमधून जो कोणी बाजी मारेल त्याला मंत्रिपदासोबतच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळते, असा मागील इतिहास आहे. त्यामुळे ही लढाई प्रतिष्ठेइतकीच दुहेरी मंत्रिपदाचीही आहे. त्यामुळे कोणतं गुलाब फुलणार? याबाबत जनतेमध्ये औत्स्युक्य आहे.
विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर धरणगाव व जळगाव तालुक्यातील गावे मिळून 2009 मध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघ तयार करण्यात आला. जळगाव ग्रामीण मतदारसंघात प्रामुख्याने शेतकरी मतदारांची संख्या मोठी आहे. विशेषतः या मतदारसंघात बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे जन्मगाव धरणगाव येते. शिवाय, बहिणाबाई चौधरी यांचे जन्मगाव असोदाही याच मतदारसंघात आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ याच मतदारसंघात येते. त्यामुळे या मतदारसंघाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे.
गेल्या तीन पंचवार्षिकच्या निवडणुका पाहिल्या तर जळगाव ग्रामीणमध्ये तत्कालीन शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. जळगाव जिल्हा तसा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात भाजपाची भूमिका महत्त्वाची आहे. कारण, 2009 पासून झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजपने आपली ताकद मतदारसंघात दाखविली आहे. जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघांत आतापर्यंत भाजपच अजिंक्य ठरला आहे. त्यामुळे भाजपचा प्रभाव असणाऱ्या या जिल्ह्यात विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील हे 1999 मध्ये एरंडोल मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. मात्र, 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी गुलाबराव पाटील यांचा पराभव केला होता. देवकर यांना 71 हजार 556 मते तर गुलाबराव पाटील यांना 66 हजार 994 मते मिळाली होती. देवकर यांना त्या वेळी भाजप-शिवसेनेची युती असताना भाजपचे नेते पी. सी. पाटील यांनी उघड साथ दिली होती, तरी शिवसेनेत गुलाबराव पाटील यांचेे महत्त्व कायम राहिले होते.
2014 मध्ये सर्व पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविल्याने शिवसेना-भाजप आमने-सामने होते. या निवडणुकीवेळी गुलाबराव पाटील यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी देवकर हे जळगाव घरकुल गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात होते. त्यामुळे 2014 मधील निवडणुकीत गुलाबराव पाटील हे विजयी झाले. त्यांना 84 हजार 20 मते मिळाली होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना सहकार राज्यमंत्रिपदावर बढती दिली होती. 2019 मध्ये गुलाबराव पाटील यांनी भाजपाचे अपक्ष म्हणून उभे राहिलेले उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचे बंड मोडून काढत विजय मिळविला. गुलाबराव पाटील यांनी 46 हजार 729 मतांनी अत्तरदे यांचा पराभव केला.
लोकसभा निवडणुकीत जळगाव व रावेर मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. जळगाव ग्रामीण मतदारसंघात महायुतीच्या स्मिता वाघ यांना 60 हजारांपेक्षा अधिक मताधिक्य होते. आता दहा वर्षांनंतर जळगाव ग्रामीण मतदारसंघात जिल्ह्याचे आजी-माजी पालकमंत्री म्हणजेच शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर हे समोरासमोर आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील लढत राज्यात लक्षवेधी आणि चर्चेची ठरणार आहे.
या मु्द्यांवर करत आहेत दोघे प्रचार
गुलाबराव पाटील यांच्याकडून आतापर्यंत मतदारसंघात करण्यात आलेली विकासकामे, रस्ते, पिण्याचे पाणी, शेतरस्ते, आरोग्यविषयक सुविधा या मुद्यांवर भर दिला जात आहे, तर देवकरांकडून बेरोजगारी, म्हसावद येथील अपूर्ण उड्डाणपुलाचा प्रश्न, कवयित्री बहिणाबाई चौधरी स्मारकाचे बांधकाम या मुद्यांवर भर देण्यात येत आहे.
मंत्रिपद देणारा जळगाव ग्रामीण मतदारसंघ
जळगाव जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या वेळी अमळनेर व रावेर हे दोन विधानसभा मतदारसंघ वगळता नऊ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले होते. 2009 मध्ये हा मतदारसंघ तयार झाल्यापासून विजयी झालेल्या आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. त्यात 2009 मध्ये देवकर यांना परिवहन राज्यमंत्रिपद मिळाले. 2014 मध्ये गुलाबराव पाटील यांना सहकार राज्यमंत्रिपद मिळाले, तर 2019 मध्ये गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री हे कॅबिनेट दर्जाचे पद व पालकमंत्रिपद मिळाले. त्यामुळे हा मतदारसंघ लकी ठरला आहे.