जळगाव दि. 17 : गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते,पाणंद,पांधण,शेतरस्ते,शिवाररस्ते,शेतावर जाण्याचे मार्ग मोकळे करावे,वहिवाटीचे रस्ते मोकळे करुन तयार करण्याच्या सुचना जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काही दिवसांपुर्वी दिल्या होत्या. त्याअनुषंगाने महसूल विभागाने शनिवारी यावल तालुक्यात विशेष अभियान राबवून विविध गावातील बंद असलेले सात शीव रस्ते मोकळे केले.
तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, मंडळ अधिकारी मीना तडवी, मंडळाधिकारी बबीता चौधरी यांनी स्थानिक तलाठ्यांच्या मदतीने शनिवारी ही विषेश मोहिम राबविली. यात सात बंद शेत रस्ते मोकळे करण्यात आले. रस्ता अडवणारे शेतकरी, गावातील सरपंच, पदाधिकाऱ्यां यांना विश्वासात घेत यशस्वीरित्या ही मोहिम राबविण्यात आली.
यात बामणोद ते म्हैसवाडी (२ किमी), सांगवी बुद्रुक ते डोंगरकोठारा (१ किमी), पिंप्री शेत पाणंद रस्ता (२ किमी), डांभुर्णी शेत पाणंद रस्ता (१ किमी), किनगाव ते कासारखेडा (दीड किमी), सावखेरसीम ते चुंचाळे शिव रस्ता (दीड किमी), यावल शिव रस्ता (१ किमी)मोकळा करण्यात आला. या सर्व रस्त्यांची एकूण लांबी १० किमी आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शेत रस्ते बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत होते. अखेर रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रस्ता खुला करण्यात आला आहे. मुख्य रस्त्यापासून आत शेतामध्ये जायचे असल्यास रस्ता नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत होते. त्यामुळे शेतात, वस्तीवर तसेच राहण्याच्या जागेवर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असत. पावसाळ्यात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतातून चिखल तुडवत जावे लागत मात्र असत . प्रशासनाने अतिक्रमणे काढून रस्ता खुला करून दिला आहे. त्यामुळे २१० शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. शेतातील पीक, मालवाहतुकीसाठी होणारा त्रास आता या अभियानामुळे कमी होणार असल्याने शेतकऱ्यांनी शेत रस्ते मोकळे करण्याच्या अभियानाचे स्वागत केले.
या मोहिमे दरम्यान, किरकोळ वादातून कित्येक वर्षांपासून हे रस्ते बंद होते. ते रस्ते खुले करण्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांना सोबत घेतले. बंद रस्ते मोकळे केल्यास होणारे फायदे पटवून दिले. त्यास शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिल्याचे तहसीलदार नाझीरकर यांनी सांगितले.