वडदा गावाजवळ भीषण अपघात; चालकाचा दुर्दैवी अंत

तरुण भारत लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२२ । नंदुरबार जिल्ह्यातील वडदा गावाजवळ रात्री गुरे घेऊन जाणाऱ्या पिकअप आणि भंगाराचे सामान घेऊन जाणारा आयशर या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात पिकअप वाहनाचा अक्षरश: चुराडा झाला. पिकअपमध्ये जवळपास नऊ गायी व वासरे, पाय आणि तोंड बांधून अत्यंत क्रूर पद्धतीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. दरम्यान, या अपघात एक जण ठार, तीन जण गंभीर जखमी झाले तर पाच ते सहा गायीचा मृत्‍यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी विसरवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलीस सूत्रानुसार, नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा विसरवाडी राज्य महामार्गावरील वडदा गावाजवळ रात्री गुरे घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहन (क्र. MH 04 EY 4565) आणि भंगाराचे सामान घेऊन जाणारा आयशर टेम्पो (क्र MH 18 BG 8805) या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअप वाहनाचा अक्षरश: चुराडा झाला आहे. पिकअप वाहनामध्ये जवळपास नऊ गायी व वासरे, पाय आणि तोंड बांधून अत्यंत क्रूर पद्धतीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आले.

एक ठार तीन जखमी
अपघात एवढा भीषण होता की पिकअप वाहन चालक जागीच ठार झाला आहे. तर पाच ते सहा गायी देखील मृत्यूमूखी पडल्या. इतर गायी गंभीर जखमी झाल्या. पिकअप सहचालक सलमान मोहम्मद व आयशर टेम्पो मधील चालक सुनील साळुंखे, सहचालक राजेंद्र शांतीलाल पवार (रा. चिंचपाडा दहिवेल, जिल्हा धुळे) हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

ग्रामस्थांची घटनास्थळी धाव
दरम्यान, अपघात होताच वडदा गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. विसरवाडी येथील रुग्णवाहिकेचे चालक व खांडबारा ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेचे चालक यांना कॉल येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना प्राथमिक उपचार देऊन नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले. रात्रीच्या अंधारात कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या मुक्या जनावरांना वाहनात डांबून ठेवलं होत. मानवी बुद्धीला पटणार नाही अशा क्रुर पद्धतीने तोंड व पाय बांधून त्यांच्यावर पुन्हा भंगाराचा सामान लादून भरधाव वेगाने हे पिकअप वाहन जात होते.

अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्यातील कर्मचारी व खांडबारा पोलीस चौकीतील कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतीचे कार्य केलं. वडदा गावातील ग्रामस्थांनीही अपघातातील जखमी गायी व चालकांना तात्काळ मदत करून उपचारासाठी पाठवले. तसेच रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला सारून महामार्ग वाहनांसाठी खुला केला. अतिशय गंभीर प्रकारे झालेल्या अपघाताचा अधिक तपास विसरवाडी पोलीस करत आहेत.