---Advertisement---
जळगाव : वाळू माफियांच्या मुजोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवल्याचा राग आल्याने वाळू माफियांनी तलाठ्याला भररस्त्यात मारहाण केली व जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील खंडेराव नगर भागात वाळू माफियांच्या मुजोरीचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंप्राळ्याचे तलाठी राजू बाहे (वय ५३) यांनी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवल्याचा राग आल्याने वाळू माफियांनी त्यांना भररस्त्यात मारहाण केली व जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
तलाठी राजू बान्हे हे कार्यालयाकडे जात असताना त्यांना विना क्रमांकाचे वाळूने भरलेले ट्रॅक्टर दिसले. त्यांनी ते थांबवून परवान्याची विचारणा केली असता, वाळू माफिया मनोज भालेराव आणि त्याचा साथीदार फैजल खान दुचाकीवरून तिथे आले.
मनोजने “हे ट्रॅक्टर माझेच आहे” असे सांगत बान्हे यांच्याशी हुज्जत घातली. जेव्हा बान्हे यांनी ट्रॅक्टर रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मनोजने त्यांची कॉलर पकडून त्यांना कानशिलात लगावली आणि शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता, मनोजच्या सांगण्यावरून फैजलने बाहे यांच्यावर ‘टॉमी’ने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
सुदैवाने, बाहे बाजूला सरकल्याने ते बचावले.या गदारोळात चालक ट्रॅक्टर घेऊन पसार झाला आणि नागरिकांची गर्दी जमताच आरोपींनीही पळ काढला. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशन मध्ये तलाठी बाहे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मनोज भालेराव, फैजल खान आणि ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









