धक्कादायक ! विवाहित मुलीस शोधण्याच्या प्रयत्नात वडीलही झाले बेपत्ता

पाचोरा : खेडगाव येथील विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना घडली असून या विवाहित मुलीस शोधण्याच्या प्रयत्नात वडीलही बेपत्ता झाले आहेत. याबाबत भावाच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात मिसिंग दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पाचोरा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील खेडगाव येथील विवाहितेचा तिच्या पतीशी कौटुंबिक वाद असल्याने मागील २ महिन्यांपासून ती माहेरी खेडगाव येथेच राहात होती. २९ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास विवाहिता घरात  कोणास काही एक न सांगता निघून गेली. मुलगी घरी परत न आल्याने तिचा शोध घेण्यासाठी वडील गेले. मात्र तेही घरी माघारी न परतल्याने त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत.

३० डिसेंबर रोजी बहीण व वडील बेपत्ता झाल्याची फिर्याद सागर अण्णा घिसाडी (पवार) याने पाचोरा पोलिसात दिल्यावरून हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

हरवलेल्या व्यक्तींचे वर्णन

माया संदीप सोनवणे (वय १९, रा. खेडगाव, ता.पाचोरा), उंची ५.५ फूट, रंग सावळा, केस काळे लांब, चेहरा गोल, डोळे मध्यम, नाक लांब, कपाळावर गोंदलेले, अंगात पांढऱ्या रंगाचा टॉप, काळ्या रंगाची लैंगिज पॅण्ट, पायात बेण्टेक्सच्या साखळ्या असे वर्णन आहे. २. अण्णा दौलत घिसाडी (वय ५०, रा. खेडगाव, ता. पाचोरा), उंची ५.७ फूट, रंग सावळा, केस लहान, बारीक दाढी, शरीर सडपातळ, अंगात फिकट आकाशी रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची सुटपॅण्ट, पांढरा रूमाल असे वर्णन आहे. वरील बेपत्ता विवाहिता व तिचे वडील आढळून आल्यास पाचोरा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.