धुळे : राज्यात एस. टी. महामंडळाच्या बसच्या अपघातात वाढ झाली आहे. यात काही ठिकाणी जीवित हानी देखील झाल्याचे पाहावयास मिळत आहे. अशातच मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे शहराकडून शिरपूरकडे जात असलेल्या विना वाहक शिवशाही बसला अचानक आग लागली. यामुळे बसमध्ये असलेल्या प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र, चालकाने अत्यंत वेळीच प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवले, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घटनास्थळी अग्निशमन दलाची पथक पोहोचली असून आग नियंत्रणात आणण्यासाठी काम करत आहेत. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी चालकाचे कौतुक करण्यात येत आहे.
धुळ्याहून शिरपूरकडे जाणार्या विना वाहक शिवशाही बस (क्र. एमएच 06 बीडब्ल्यू 0470) ला रात्री गोराने फाट्याजवळील हॉटेल सुवर्णनगरीजवळ अचानक अपघात झाला. गाडीचा मागचा टायर फुटल्याने त्यात आग लागली आणि त्यामुळे बस देखील पेटली. बसच्या टायरला आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर, चालक प्रदीप भरतसिंग पवार यांनी वेळीच प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना बसमधून सुरक्षितपणे खाली उतरवले. यामुळे मोठा अनर्थ टळला आणि सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
आग लागल्यानंतर स्थानिक लोकांच्या आणि जिंदाल पावर पॉइंट येथील कंपनीच्या अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझविण्यात आली. नरडाणा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोरे, मनोज कुवर, विक्रांत देसले, नारायण गवळी, दीपक भामरे, गजेंद्र पावरा, अर्पण मोरे तसेच गोराणे गावचे पोलीस पाटील मनोज भामरे यांनी आग विझविण्यात सहकार्य केले.
या अपघातात बसचे संपूर्ण नुकसान झाले असून, गाडीतील सर्व सीट्स आणि बस जळून खाक झाली आहे. घटनास्थळी एसटी महामंडळाचे व्यवस्थापक शिवदे, धुळे व्यवस्थापक मनोज पवार, तसेच शिरपूर येथील अनुराधा चौरे उपस्थित होते.