जळगाव : जिल्ह्यातील यावल शहरात चोपडा रस्त्यावर ख्वाजा मस्जिद जवळील एका फर्निचरच्या दुकानास सोमवारी पहाटे अचानक आग लागली. आगीत सुमारे पाच लाखांचे साहित्य जळून खाक झाले आहे. आगीचा पंचनामा तलाठी गजानन पाटील यांनी केला आहे.
यावल शहरातील विस्तारित भागात हरिओम नगर आहे. या नगरातील गट नंबर ५० मधील प्लॉट नंबर पाच मध्ये फर्निचर बनवणाऱ्या दुकानात दिनांक १४ चे पहाटे दोन वाजेचे सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागली. या आगीत पत्रांचे शेड, दहा क्विंटल सलाइटिंग, ७० दरवाजे यासह मशनरी आदी जळून खाक झाले. सुमारे नऊ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
शेख जाकीर शेख कमरोद्दिन आणि शेख अस्लम शेख जाकीर यांच्या मालकीचे सर्जरी ग्लास व अल्युमिनियम नावाचे दुकान आहे. त्यांनी चार महिन्यापूर्वी महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून चार लाख रुपये कर्ज घेतले होते तर दोन महिन्यापूर्वी बडोदा बँकेतून दोन लाख रुपयांचा उचल केली आहे. असे एकूण सहा लाखाचे कर्ज त्यांच्यावर आहे. कच्चे मटेरियल धरून दुकानात आठ ते दहा लाखांचा मुद्देमाल होता.
दुकानाच्या बाजूस असलेल्या अंजली गोपीनाथ सोनवणे यांचा रहिवास आहे. त्यांच्या घरात दुकाना लगतच किचन रूम आहे. या किचन रूममध्ये गॅस हंडी आहे. सुदैवाने येथे काही नुकसान झाले नाही. घटनास्थळी यावल नगर परिषद माजी उपनगराध्यक्ष इकबाल खान व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेटी देऊन दुकान मालकांच्या झालेल्या नुकसानाबाबत खंत व्यक्त केली. त्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.