जळगाव : क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर टीम इंडियाने अखेर आपले नाव कोरले आहे. हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने 12 वर्षांनंतर ही मालिका जिंकली आहे. या पुर्वी धोनीच्या नेतृत्वातील टीम इंडियाने 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले होते.
रविवार 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात, कर्णधार रोहित शर्माच्या दमदार खेळीच्या बळावर टीम इंडियाने विजय मिळविला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव केला. भारताच्या विजयच्या जल्लोषात नागरिकांकडून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना होऊन भारताने विजय मिळविला. विजयी चौकार लगावताच सर्वत्र आतषबाजी झाली. अशाच प्रकारे काव्यरत्नावली चौकातदेखील आतषबाजी करण्यात आली. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने विजय मिळविताच आतिषबाजी होत असताना फटाक्यांची ठिणगी गवतावर जाऊन पडल्याने पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या बाजूला आग लागली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.
जिल्हा पोलिस अधीक्षक निवासस्थानाच्या बाजूला असलेल्या गवतावर फटाक्यांची ठिणगी जाऊन पडल्याने आग पसरली. नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला तसेच महानगरपालिकेच्या अग्निशामन दलाचा एक बंब देखील दाखल झाला. एका बंबाद्वारे आग नियंत्रणात आणली. सुदैवाने यात कोणालाही हानी झाली नाही.