---Advertisement---
धरणगाव : तालुक्यातील चांदसर गावाजवळील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा करण्यात येत होता. त्यांच्यावर महसूल पथक आणि धरणगाव पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करीत संयुक्तपणे कारवाई केली. या कारवाईत वाळूची अवैध वाहतूक करणारी पाच वाहने जप्त करण्यात आली आहेत.
चांदसर गावाजवळ शुक्रवारी (१८ जुलै) रात्री दहा ते सकाळी तीन वाजेपर्यंत महसूल व धरणगाव पोलिस यांच्या संयुक्त पथकाने कोंबिंग ऑपरेशन राबवले. चांदसर गावात तसेच आजूबाजूच्या शेतांमध्ये आणि गिरणा नदी पात्रात वाळूची अवैध करणाऱ्या वाहनांचा कसून शोध घेण्यात आला. यावेळेस वाळूची अवैध वाहतूक करणारे काही वाहन मालक व त्यांच्या कुटुंबियांनी या पथकासोबत वाद घातला.
---Advertisement---
यावेळी कुटुंबातील महिला, ज्येष्ठ नागरिक, तसेच लहान मुलांनी वाहने नेऊ नयेत, यासाठी प्रयत्न केले. या कारवाईत पाळधी पोलिसांच्या सहकार्याने पाच ट्रॅक्टर जप्त करून पाळधी पोलिस स्टेशन येथे आणून लावण्यात आली आहेत. या कारवाई वेळी चांदसर येथील गणेश कोळी या व्यक्तीने आपल्या साथीदारांसह नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या उपस्थितीत पथकाला दमदाटी व शिवीगाळ करून दोन ट्रॅक्टर नदीच्या दिशेने गावाकडे पळवून नेले. याचा शोध रात्री पोलीस व महसूल पथकाने घेतला.
परंतु अंधार व चिखल यामुळे ती वाहने सापडू शकली नाहीत. तसेच वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रॉलीला कोणीही मालकी हक्क सांगत नसल्याने व ती ट्रॉली पोलिस स्टेशनला आणणे शक्य नसल्याने पेटवून देण्यात आली. या पथकामध्ये तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, संदीप मोरे, हेमंत महाजन, अमोल पाटील, आरिफ शेख, प्रकाश जामोदकर, राकेश पाटील, संदेश आखाडे, राहुल ढेरंगे, गौरव बाविस्कर, हर्षल थाटे, विश्वंभर शिरसाठ, शिवाजी महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे व पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.