Vidhan Sabha Election 2024 : मतदार यादीत नाव शोधताय ? मग फॉलो करा या स्टेप्स

Online Voter List : राज्यभरात लवकरच विधानसभेच्या निवडणुकीची तारखा जाहीर होणार आहे. राज्यात सध्या निवडणुकांचे वातावरण असून, केंद्रीय निवडणूक आयोगानेदेखील विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.

निवडणुका जाहीर झाल्या की मतदार यादी देखील जाहीर होते आणि ही मतदार यादी दरवेळी बदलत असते. काही वेळा अचानक बऱ्याच जणांची नावं मतदार यादीतून गायब होतात. मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, आपले मतदान केंद्र नक्की कोठे आहे याचा शोध आपण ऐन मतदानाच्या दिवशी घेतो. त्यामुळे काही वेळा मतदारांना अनेक अडचणींचा सामोरे जावे लागते. त्यामुळे आपण घरबसल्या मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही हे जाणून घेऊ अगदी सोप्या पद्धतीने.

मतदार यादीत तुमचं नाव कसं शोधाल?
सर्वांत आधी electoralsearch.eci.gov.in ला सर्च करा, या लिंकवर जाताच तुम्हाला एका पेजवर तुमचे नाव, वडिलांचे नाव, पतीचे नाव, जन्मतारीख, वर्ष, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ यांच्या माहितीची नोंद करावी लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर ‘कॅप्चा’ कोड टाकावा लागेल आणि मग ती संबंधित यादी उघडेल. यानंतर आता खाली मतदार यादीतील तुमचं नाव, EPIC Number आणि सर्व माहिती दिसेल.

EPIC नंबर नसल्यास काय करावे?
जर आपल्याकडे EPIC क्रमांक उपलब्ध नसेल, तर फोन नंबर किंवा इतर माहितीच्या आधारे देखील शोधता येईल. ‘तपशीलांद्वारे शोधा’ या पर्यायासाठी, आपल्याला जन्मतारीख, जिल्हा, विधानसभा आणि नातेवाईकांची माहिती आवश्यक असेल. EPIC क्रमांकाशिवाय इतर माहिती वापरून आपले नाव शोधत असाल, तर ती माहिती भविष्यातील संदर्भासाठी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

मतदार यादीत नाव कसे नोंदवावे?
मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी तुम्हाला अर्ज क्रमांक ६ भरावा लागेल, जो इतर फॉर्मसह ECI वेबसाइटवर उपलब्ध आहे. तुमचा मोबाईल फोन नंबर किंवा ईमेल पत्ता वापरून साइन अप केल्यानंतर तुम्ही हा फॉर्म ऑनलाइन भरू शकता. नाव, लिंग, पत्ता, जन्मतारीख आणि नातेवाईक (वडील, आई, पती किंवा पत्नी) यांसारखे तपशील भरण्याव्यतिरिक्त अर्जदाराला जन्मतारीख सिद्ध करण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही एका कागदपत्राची स्वयंसाक्षांकित प्रत द्यावी लागेल. सक्षम स्थानिक संस्था/महानगरपालिका प्राधिकरणाने जारी केलेले जन्म प्रमाणपत्र दस्तऐवज म्हणून जोडता येईल.अशाप्रकारे तुम्हाला मतदार यादीत तुमचे नाव नोंदविता येईल.