जळगाव : सायबर गुन्हेगारांकडून विविध माध्यमातून सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार नित्यनियमाने घडत आहेत. हे गुन्हेगार नवीन-नवीन तंत्रज्ञान आणि सायबर पद्धती वापरून लोकांना फसवित आहेत. यात फोन कॉल्स, व्हाट्सअॅप संदेश, बनावट ईमेल्स, सोशल मीडिया प्रोफाइल्स आणि ऑनलाइन फसवणूकीचे अनेक प्रकार घडत आहेत. सायबर फसवणुकीस जळगाव जिल्ह्यातील नागरिक देखील बळी पडत असल्याचे समोर आले आहे.
बुधवार, २५ तारखेला यावल येथील वृद्ध दाम्पत्यास सायबर ठगांनी व्हाट्सअप कॉलद्वारे धमकावत १ लाख ३० हजारांची फसवणूक केली आहे. ही घटना ताजी असताना जळगाव शहरात देखील एका महिलेची सायबर ठगांनी चक्क २५ लाखांची फसवणूक केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील एका महिलेला सायबर ठगांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून २५ लाख रुपयांची फसवणूक केली. महिलेला मुंबई सायबर पोलीस असल्याची बतावणी करून त्यांना इंटरपोल, सीबीआय, आणि सुप्रीम कोर्टाची बनावट नोटीस पाठवून धमकावले गेले. त्यात महिला यांना अटक करण्याची धमकी देण्यात आली, तसेच जीवे मारण्याची धमकी देत इन्सपेक्शन फीच्या नावाखाली पैसे मागवले.
सायबर ठगांनी व्हाट्सअपवरून व्हॉइस कॉल, व्हिडिओ कॉल आणि मेसेजद्वारे महिलेला गोंधळात टाकले आणि त्यांना सगळ्या आरोपांतून बाहेर पडण्यासाठी २५ लाख रुपये एका बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. भेदरलेल्या महिलेने त्यांचे आदेश मान्य करून पैसे भरले.
पुढे, महिलेला आपण सायबर फसवणुकीची शिकार झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणी प्रविणकुमार, के.सी. सुब्रमन्यम, प्रदीप सांवत, आणि संदिप राव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सतिश गोराडे यांच्या नेतृत्वात सुरू आहे.