Jalgaon: कचरा फॅक्टरीनं खूपच त्रास वाढलाय. घरात थांबणंही कठीण झालंय. श्वास गुदमरायला होतंय. कुटुंबात आजारपण वाढलंय. घंटागाड्यांतून रस्त्यावर कचरा पडून दुर्गंधीयुक्त वातावरण झालंय, असा रोष शहरातील चंदूअण्णानगर परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केला. आता सुस्त व झोपलेल्या महापालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही रहिवाशांनी दिला आहे.
डम्पिंग ग्राउंडवर अडीच ते तीन टन कचरा
महापालिका आरोग्य विभागाकडून शहरातून रोज निघणारा कचरा टाकण्यासाठी आव्हाणे शिवारात डम्पिंग ग्राउंड आहे. तेथे रोज ८० ते ८५ घंटागाड्यांच्या माध्यमातून अडीच ते तीन टन कचरा टाकला जातो. मात्र, आता हे डम्पिंग ग्राउंड ओसंडून वाहत आहे. तेथील बायोमायनिंगची प्रक्रिया थांबली आहे. त्यामुळे पुन्हा हे डम्पिंग ग्राउंड ओसंडले आहे. तेथे कचरा सतत जळत असल्याने निघणाऱ्या विषारी धुरामुळे लगतच्या चंदूअण्णानगरसह परिसरात दुर्गंधी पसरते. परिसरातील रहिवाशांना सर्दी, खोकला, ताप यांसह विविध साथरोगांना सामोरे जावे लागते.
चंदूअण्णानगरसह परिसरातील पोलीस कॉलनी, रेणुकानगर, पवार पार्क यांसारख्या कॉलन्यांत सुमारे २० ते २५ हजारांवर लोकसंख्या आहे. डंपिंग ग्राउंडमधील कचऱ्यामुळे होणाऱ्या त्रासाबाबत महापालिका आयुक्तांसह आरोग्य अधिकाऱ्यांना लेखी, तोंडी तक्रारी करीत पाठपुरावा करण्यात आला. मक्तेदाराची चोरी लपविण्यासाठी हा कचरा जाळला जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. आता मुलांना त्वचारोगही होत आहेत.
धुरामुळे अनेक आजारांचा धोका
धुरामुळे परिसरात कर्करोगाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. आठ-दहा दिवसांपूर्वी परिसरातील रहिवासी कर्करोगाचा बळी ठरला. याप्रसंगी चंदूअण्णानगर पोलीस कॉलनी, पवार पार्क, रेणुका नगर, शुदत्त कॉलनी या परिसरातील भरत सैंदाणे, ज्ञानेश्वर पाटील, हेमंत पाटील, दीपक कोळी, सौरभ पाटील, राज कोळी, सुरेश पाटील, मनोज पाटील, कल्पना बाविस्कर, भालेराव, रूपाली पाटील, वैशाली पवार, संगीता चौधरी, पिंटू देशमुख, सैंदाणे यांच्यासह परिसरातील संत्रस्त बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.