---Advertisement---

मनपाच्या रोजंदारी कामगारांना न्याय द्या, आमदार भोळेंनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात वेधले शासनाचे लक्ष

by team
---Advertisement---

जळगाव : महापालिकेसमोर तीन दिवसांपासून बेमुदत आंदोलन करणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासनाने लक्ष देऊन न्याय द्यावा, अशी मागणी करीत आमदार सुरेश भोळे यांनी विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी (१२ मार्च) शासनाचे लक्ष वेधले. त्यांनी शहरातील विविध प्रश्नांचा ऊहापोह केला.

मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानुसार सफाई कामगारांचे कायम करण्याबाबतचे प्रस्ताव शासनाकडे पाठवून त्याची पाठविल्याची ठरावाची प्रतही संघटनेला द्यावी, या मागणीसाठी जळगाव महानगरपालिका कामगार युनियनतर्फे महापालिकेसमोर १० मार्चपासून बेमुदत आंदोलन पुकारले आहे. बुधवारी (१२ (१२ मार्च) आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी ऑल इंडिया म्युनिसिपल वर्कर फेडरेशनचे अध्यक्ष उदय भट यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. या वेळी त्यांनी कामगारांचा प्रश्न नगरविकासमंत्र्यांची भेट घेऊन मांडतील, अशी ग्वाही आंदोलककर्त्यांना दिली. तसेच पुणे, अहिल्यानगर, श्रीरामपूर येथील
महापालिकांच्या धर्तीवर येथील महापालिकेतील रोजंदारी कामगारांना न्याय मिळवून देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या आंदोलनाबाबत आमदार सुरेश भोळे यांनी बुधवारी (१२ मार्च) विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित करीत शासनाचे लक्ष वेधले. तीन दिवस उलटले तरी महापालिकेसमोर रोजंदारी कर्मचारी आंदोलन करीत आहेत, उपोषणाला बसले आहेत. अशाच प्रकरणात मुंबई महापालिकेत न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही केली आहे. त्याच धर्तीवर या कामगारांना न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली.

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने २२ ऑगस्ट २०२३ रोजी ६४५ सफाई कामगारांना कायम करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार दोन महिन्यांच्या आत प्रस्ताव शासनाकडे पाठवावा म्हणून जळगाव महानगरपालिका कामगार युनियनतर्फे १० फेब्रुवारी २०२५ रोजी धरणे आंदोलन पुकारले होते. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ११ फेब्रुवारीला महापालिका आयुक्तांनी संघटनेला पत्र देऊन पुढील १० दिवसांत प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याबाबत कळविले होते. त्यानंतर संघटनेने आंदोलन स्थगित केले. मात्र, संघटनेने शासनाच्या संबंधित खात्याकडे चौकशी केली असता, असा कोणताही प्रस्ताव त्यांना प्राप्त झाला नाही, असे संघटनेला समजले. त्यामुळे आंदोलन सुरू असताना असे पत्र देऊन आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांना खोटे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले, असा आरोपही

आंदोलकांनी केला. प्रत्यक्षात ठराव पाठविला नसल्याने सफाई कामगारांमध्ये महापालिका प्रशासनाबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार सफाई कामगारांचे कायम करण्याबाबतचे प्रस्ताव पाठवून त्याची पाठविल्याची ठरावाची प्रतही संघटनेला दिल्याशिवाय बेमुदत धरणे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. आंदोलनात संघटनेचे सरचिटणीस विकास आळवणी, सहसचिव रवींद्र सोनवणे, उपाध्यक्ष आधार वाघ, अध्यक्षा वैशाली आळवणी, सदस्य सुनील सुरवाडे, कल्पना सपकाळे, कलाबाई पारधे आदींसह रोजंदारी कर्मचारी सहभागी आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment