राज्यातील स्वस्त धान्य लाभार्थ्यांसाठी सरकारकडून आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. यंदाच्या होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील रेशनकार्ड धारकांसाठी राज्य सरकारकडून मोठं गिफ्ट मिळणार आहे. यंदाच्या होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील हजारो महिलांना अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे.
मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही राज्य सरकारने अंत्योदय रेशनकार्डधारक कुटुंबातील एका महिलेला साडी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम गरजू महिलांना सहकार्य करण्यासाठी राबवला जातो. जालना जिल्ह्यातील 44,160 महिलांना आणि पुणे जिल्ह्यातील 48,874 महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 7,975 साड्या बारामती तालुक्यातील महिलांना वितरित केल्या जातील.
पुणे जिल्ह्यातील तालुका-निहाय लाभार्थी संख्या
तालुका | लाभार्थी महिलांची संख्या |
---|---|
बारामती | 7,975 |
दौंड | 7,222 |
जुन्नर | 6,838 |
पुरंदर | 5,285 |
आंबेगाव | 5,137 |
इंदापूर | 4,453 |
शिरूर | 3,990 |
खेड | 3,218 |
भोर | 1,909 |
मावळ | 1,536 |
मुळशी | 540 |
हवेली | 251 |
साडीचे वाटप कसे होणार?
राज्य पुरवठा विभागाकडून यासाठी पुरवठा केला जाणार असून, रेशन दुकानांमार्फत साडीचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात येईल. लाभार्थ्यांनी आपले अंत्योदय रेशनकार्ड दाखवून साडी मोफत घेता येईल. गेल्या वर्षी सुद्धा सरकारने हा उपक्रम राबवला होता, मात्र काही ठिकाणी दिलेल्या साड्या कुचक्या किंवा फाटक्या असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे यावर्षी लाभार्थ्यांनी रेशन दुकानावरच साडी नीट तपासून घ्यावी. दोष आढळल्यास तत्काळ तक्रार नोंदवावी.
लाभार्थ्यांसाठी सूचना
रेशन दुकानात जाऊन स्वतः साडी तपासून घ्या.
जर साडी फाटकी किंवा खराब असेल तर त्वरित तक्रार करा.
साडी घेताना आपल्या अंत्योदय रेशनकार्डची नोंद करून घ्या.
होळीपूर्वी साडी मिळण्याची खात्री करून घ्या.
ही योजना गरजू महिलांसाठी एक मोठी मदत असून, सरकारच्या या निर्णयामुळे हजारो महिलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकणार आहे.