शिरपूर : तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या ग्रामदेवतांच्या यात्रांचा धडाका सुरू झाला असुन, यामुळे छोट्या- मोठ्या व्यापाऱ्यांचीही चांगलीच चलती सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचे कालचक्र पुन्हा सुरू झाले आहे.
तालुक्यातील गावोगावी सध्या ग्रामदेवतांच्या यात्रा सुरू झाल्या आहेत. पाळणेवाले, खेळणीवाले, मेवा-मिठाईवाले, नारळ विक्रेते यांसह अनेक छोटे-मोठे व्यावसायिक उदरनिर्वाहासाठी सुमारे तीन ते चार महिने या यात्रांवर अवलंबून असतात. त्यावरच प्रपंचाचा भार पेलत असतात.
गेली काही वर्षे कोरोना, दुष्काळ, अवकाळी, गारपीट, मंदी यामुळे या व्यावसायिकांची चांगलीच अवहेलना झाली होती; परंतु सध्या तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामदेवतांच्या यात्रांना प्रारंभ झाला आहे. त्यामुळे या व्यावसायिकांचे अर्थकारण पुन्हा एकदा पूर्वपदावर येऊ लागले आहे. या व्यवसायास ऊर्जितावस्था येऊ लागली आहे.
ग्रामीण भागातील यात्रांचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या तमाशा, ऑर्केस्ट्रा, कुस्ती मैदान, विविध प्रकारच्या शर्यती अर्थात बैलगाडी, घोडागाडी, सायकल यासारख्या कलावंतांमध्ये सध्या फिलगुडचे वातावरण नक्कीच दिसून येत आहे.
यात्रेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम होत असल्याने कलाकारांनाही प्रोत्साहन मिळत आहे. बैल व घोडागाडी पळविणाऱ्या शर्यतशौकिनांना प्रोत्साहन मिळत आहे. यात्रेनिमित्त कुस्ती मैदान गाजत असल्याने कुस्ती कलेलाही प्रोत्साहन मिळत आहे. ग्रामीण भागात आजही यात्रा परंपरा कायम टिकून राहिली आहे.
यात्रेनिमित्त प्रत्येक गावात गावच्या ग्रामदैवताची, घरादाराची स्वच्छता करून रंगरंगोटी केली जात आहे. नोकरीनिमित्त बाहेर असलेले ग्रामस्थ यात्रेनिमित्त गावी परतत आहेत. यात्रेनिमित्त खेळणी, खाऊची दुकाने, लहान मुलांच्या खेळाची साधने गावात आणणाऱ्या व्यावसायिकांना चांगले दिवस आले आहेत.