पुणे : समृद्ध भारत घडविण्यात ‘तरुण भारत’चे लक्षणीय योगदान आहे, समाजासाठी जे काही करता येईल त्या दिशेने ‘तरुण भारत’ची वाटचाल सुरू आहे, असे विचार केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केले. ‘जळगाव तरुण भारत’च्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे येथे झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
राष्ट्रीय विचारांचा ‘जळगाव तरुण भारत’ दरवष नवनवीन विषय घेऊन, समाजातील परिस्थितीला अनुसरून विशेषांक काढत असतो. त्याच अनुषंगाने बांगलादेशातील पूर्वस्थिती आणि सद्य:स्थितीला अनुसरून ‘बंगभूमी ते रझाकारी व्हाया बांगलादेश’ हा विषय घेऊन यंदाचा अर्थात 2024 चा दिवाळी विशेषांक ‘तरुण भारत’ने काढला आहे.
या दिवाळी विशेषांकाचा प्रकाशन समारंभ सोमवार, 28 ऑक्टोबर रोजी दुपारी पुणे येथे थाटात पार पडला. त्यात आपले विचार व्यक्त करताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पुढे म्हणाले, ‘भारतीय संस्कृती आणि आमच्या गौरवशाली इतिहासाबद्दल ‘तरुण भारत’ने वेळोवेळी आजच्या परिस्थितीला अनुसरून चांगले विशेषांक काढलेले आहेत. या विशेषांकांनी आमच्या ज्ञानात वाढ तर झाली आहेच. त्यातून चेतना जागरुक झाली आहे. याशिवाय आजच्या समाजात आमचे जे मुद्दे उपस्थित करायचे आहेत, समाजासाठी जे विषय घ्यायचे आहेत, त्यावर ‘तरुण भारत’ने प्रकाशझोत टाकला आहे. वैभवशाली भारत बनविण्याचा, एक समृद्ध भारत बनविण्याचे आमचे जे सर्वांचे स्वप्न आहे, त्या दिशेने ‘तरुण भारत’चे खूप मोठे योगदान आहे. मी ‘तरुण भारत’चे अभिनंदन करतो. तसेच ‘तरुण भारत’शी जुळलेल्या सर्व घटकांचे विशेषत: नवयुवक आणि नवयुवतींचे अभिनंदन करतो. तसेच ‘तरुण भारत’साठी माझ्या सदैव शुभेच्छा आहेतच, असेही रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सुरुवातीला ‘जळगाव तरुण भारत’चे निवासी संपादक चंद्रशेखर जोशी यांनी ‘तरुण भारत’ दरवष नवनवीन विषय घेऊन दिवाळी विशेषांक काढत असतो. यासंदर्भातील माहिती दिली. सर्जना मीडिया सोल्युशन्स प्रा. लि.चे प्रकल्प सहप्रमुख संजय नारखेडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय सहकार्यवाह स्वप्नील चौधरी, ‘तरुण भारत’चे विपणन व्यवस्थापक मनोज बोरसे, विपणन सहायक गायत्री कुलकर्णी आदी उपस्थित होते.