GST : जीएसटीएन प्रणालीत तांत्रिक बिघाड असल्याच्या तक्रारी करदात्यांनी केली होती. याची दखल घेत सरकारने शुक्रवारी मासिक जीएसटी विक्री विवरणपत्र फॉर्म जीएसटीआर-१ आणि जीएसटी पेमेंट भरण्याच्या अंतिम मुदतीत दोन दिवसांची वाढ केली आहे.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या (CBIC) अधिसूचनेनुसार, डिसेंबरसाठी GSTR-1 दाखल करण्याची शेवटची तारीख १३ जानेवारी असून ऑक्टोबर- डिसेंबरचा कालावधी १५ जानेवारी आहे. ज्या करदात्यांनी कर भरण्याचा पर्याय निवडला आहे त्यांच्यासाठी ही तारीख १५ जानेवारी असणार आहे.
साधारणपणे, मासिक रिटर्न फाइल करणाऱ्यांसाठी GSTR-1 दाखल करण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी असते, तर तिमाही करदात्यांसाठी ती १३ जानेवारी असते. डिसेंबरसाठी GSTR-3B दाखल करून GST भरण्याची अंतिम मुदत सध्याच्या 20 जानेवारी वरून 22 जानेवारी करण्यात आली आहे.
त्रैमासिक आधारावर जीएसटी भरणाऱ्या करदात्यांना, व्यवसायाच्या राज्यनिहाय नोंदणीच्या आधारावर देय तारीख २४ जानेवारी आणि २६ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. आदल्या दिवशी, वस्तू आणि सेवा कर नेटवर्क (GSTN) ने केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाला (CBIC) प्रणालीतील तांत्रिक त्रुटींबद्दल अहवाल पाठवला होता आणि GST विक्री विवरणपत्र किंवा GSTR दाखल करण्याची तारीख वाढवण्याची विनंती केली होती.
GSTN ने त्यांच्या अधिकृत हँडल GST Tech द्वारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, GST पोर्टल सध्या तांत्रिक समस्यांना तोंड देत आहे आणि त्याची देखभाल केली जात आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत हे पोर्टल कार्यान्वित होईल अशी अपेक्षा आहे. दाखल करण्याची तारीख वाढवण्याबाबत विचार करण्यासाठी घटनेचा अहवाल सीबीआयसीकडे पाठवला जात आहे.
गुरुवारपासून जीएसटी नेटवर्कमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. करदात्यांना GSTR-1 चा सारांश तयार करणे आणि रिटर्न दाखल करणे शक्य नाही.