मुक्ताईनगर : परराज्यातील ट्रकमधून गुटख्याची तस्करी होणार होती. याची गुप्त माहित पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी पुर्नाड फाट्या येथे हा ट्रक जप्त करत दोन कोटी आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी परप्रांतीय चालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताईनगर-बर्हाणपूर रस्त्यावरील पूर्णाड फाट्यावर रविवार, १ रोजी सकाळी साडेदहा वाजता करण्यात आली.
जळगाव स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ निरीक्षक बबन आव्हाड यांना गुटखा वाहतुकीबाबत गुप्त माहिती मिळाली होती. हि माहिती मिळताच त्यांनी पथकांना निर्देश दिले. मुक्ताईनगर पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई केली. यात हा ट्रक (एन.एल. ०१ ए.जे.१७२५ ) पूर्णाड फाट्यावर आल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत प्रतिबंधीत गुटखा आढळून आला. तो पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.
मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये ट्रक चालक सकरुल्ला अब्दुल अजीज (३५ , इमाम नगर, जेरका, फिरोजपूर, जि.नुहू, हरियाणा), तारीफ लूकमान खान (२३ , इमाम नगर, तहसील जेरका, फिरोजपूर, जिल्हा नुहू मेवात, राज्य हरियाणा) , कैफ फारुख खान (१९ , ढळायत, पहाडी, जि.भरतपूर, राजस्थान) यांच्याविरोधात हवालदार रवींद्र अभिमान पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपींना अटक करण्यात आली.
३० लक्ष रुपये किंमतीचा एक टाटा कंपनीचा दहा चाकी ट्रक, ट्रॅकमधून ४३ लक्ष ७७ हजार ६०० रुपये किंमतीचा रॉयल १००० असे इंग्रजीत लिहिलेला गुटखा, एक कोटी ३४ लाख ८८ हजार ४८० रुपये किंमतीचा एकूण १०२ पिवळ्या रंगाच्या गोण्यांमधील ५ एचके असे इंग्रजीत लिहिलेला गुटखा, १० हजार रुपये किंमतीचा विवो मॉडेलचा मोबाईल फोन, पाच हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल व दिड हजार रुपये रोख मिळून एकूण दोन कोटी आठ लाख ८२ हजार ५८० रुपयांचा सुगंधित गुटख्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी तपास करीत आहेत.