Jalgaon News : जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यात शनिवारी (१२ एप्रिल) आणि जळगाव तालुक्यात रविवारी (१३ एप्रिल) आलेल्या वादळी वाऱ्यांसह पावसामुळे व गारपिटीनंतर शेतपिकांचे नुकसान झाले आहे. विशेषतः रावेर शहरासह भोकर, भादली खुर्द परिसरात, तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणीही केळी व मका या पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. अचानक आलेल्या या हवामान बदलामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.
वादळामुळे बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर झाड कोसळल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाच्या मदतीने तत्काळ एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून, वीजवाहिन्यांचेही नुकसान झाले आहे. उन्हाच्या तडाख्यानंतर थोडासा गारखा अनुभवास आला असला, तरी गारपिटीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. काही शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांच्याशी दूरध्वनीवरून वरून संपर्क साधून तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासनामार्फत बाधित भागात नुकसानीचा प्राथमिक आढावा घेण्याचे कार्य सुरू असून, संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
“शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेता तत्काळ मदतीचा प्रस्ताव तयार करून अहवाल शासनाकडे सादर करण्यात यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदतीचा दिलासा देता येईल,” असे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच हवामान खात्याच्या सूचनांचा विचार करून शेतकऱ्यांनी पिकांचे व पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
चोपडा तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस
चोपडा तालुक्यात वातावरणात दर तासाला बदल होत होता. दोन दिवसांपासून उकाडा कमी-अधिक होत होता. त्यामुळे पावसाची हजेरी केव्हा लागेल, हे सांगता येत नव्हते. रविवारी (१३ एप्रिल) दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान तालुक्यातील धानोरा, मितावली, पंचक, गोरगावले, खेडीभोकरी, माचला परिसरात अवकाळी पावसासह गारपीट झाली. १५ ते २० मिनिटे गारपीट सुरू होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. अवकाळी पावसाने शेतकरी भयभीत झाले आहेत.