---Advertisement---
अमळनेर : तालुक्यातील व्यवहारदळे शिवारात मंगळवारी (१५ जुलै) रोजी सायंकाळी उशिरा अंधारात घडलेला प्रकार गावात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. महेंद्र सुरेश पाटील हे शेताकडे जात असताना त्यांनी जंगल परिसरात असलेल्या एका प्राचीन हनुमान देवस्थानाजवळ संशयास्पद खोदकाम सुरू असल्याचे दिसले. याबाबत त्यांनी अधिक चौकशी अधिक चौकशी करीत पोलिसांना कळविले असता तेथून तिघांना अटक करण्यात आली असून चौघे फरार झाले आहेत.
जंगलातील हे हनुमान देवस्थान खेडी रामेश्वर, जुनोने, टाकरखेडा, खुर्द अशा गावांच्या सीमेवर व वनक्षेत्र असल्याने ते पूर्वीपासूनच गूढ मानले जाते. याच ठिकाणी साधारण अर्धा माणूस पुरेल कमरे इतके खोदून अज्ञात व्यक्तींनी हनुमानाची मूर्ती बाहेर काढलेली होती. महेंद्र पाटील यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता, तिघे जण फावडे घेऊन खोदकाम करत होते.
---Advertisement---
त्यांनी आपली नावे प्रदीप राजेंद्र बडगुजर (रा. शिरुड नाका), संदीप उर्फ बाळू सुमितलाल कोठारी, आणि गणेश उर्फ इशान अशी सांगितली. यावेळी चौघेजण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. त्यांची नावे आसिफ उर्फ छोटू बागवान, जहूर पठाण (२ इसम) व इक्बाल शेख अशी उघड झाली आहेत.
या प्रकारामुळे गावात संभ्रमाचे वातावरण असून, हे खोदकाम फक्त गुप्तधनाच्या शोधासाठी होते की हनुमान मूर्तीच्या नावाने अघोरी कर्मकांड वा नरबळीसारख्या प्रकारासाठी, यावर संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तेथील काही साहित्य ताब्यात घेतले असून, अटकेत असलेल्या तिघांकडून कसून चौकशी सुरू आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. हा प्रकार धार्मिक भावनांशी खेळणारा आणि गंभीर गुन्हा असल्याने याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. गावातील नागरिकांनी जागरूक राहून अशा प्रकारांची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.