पिंप्राळ्यात श्री हनुमान जन्मोत्सव भव्य-दिव्य; १००८ ऑर्किड सजावट व ५१०० लाडूंचा महाप्रसाद आकर्षण

---Advertisement---

 

पिंप्राळा परिसरात यंदा श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तीभावात आणि भव्य-दिव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. गुरुवारी होणाऱ्या या जन्मोत्सवानिमित्त केसरीनंदन मंदिरात केलेली १००८ ऑर्किड फुलांची नयनरम्य सजावट आणि तब्बल ५१०० लाडूंचा महाप्रसाद हे यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. यासोबतच भव्य मिरवणूक, हनुमंत कथा आणि मोफत दंत तपासणी शिबिरासारख्या सामाजिक उपक्रमांची रेलचेल असणार आहे.


श्री केसरी नंदन बहुउद्देशीय संस्था (पिंप्राळा) यांच्या वतीने यंदाचा जन्मोत्सव अतिशय भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. जन्मोत्सवाच्या निमित्ताने मंदिराला १००८ आर्किड फुलांची अतिशय मनमोहक आणि वेगळ्या धाटणीची सजावट केली जाणार आहे, जी भाविकांसाठी एक पर्वणीच असेल. दररोज रात्री ८ ते ११ या वेळेत मनोज महाराज कुलकर्णी (पिंप्राळा) यांच्या सुमधुर वाणीतून श्री हनुमंत कथा होत असून ती ४ एप्रिलपर्यंत असणार आहे. गुरूवारी सकाळी ठीक ६ वाजता जन्मोत्सव व महाआरती होईल. रविवार, ५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता पिंप्राळा रथ मार्गावरून भव्य-दिव्य मिरवणूक काढण्यात येईल.


२१ डझन केळीचा प्रसाद वाटणार

हनुमान जन्मोत्सवाच्यावेळी ५१०० लाडू आणि २१ डझन केळींचा प्रसाद भाविकांना वाटप केला जाणार आहे. शिवाय, ५ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ ते १० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यात पारंपरिक वरण-बट्टी आणि वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद असणार आहे.



कष्टभंजन वीर हनुमान मंदिर: जन्मोत्सवासोबत आरोग्य शिबिराचा संगम
पिंप्राळ्यातील शंकर आप्पा नगरामधील कष्टभंजन वीर हनुमान मंदिरातही सालाबादप्रमाणे जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. सकाळी ६ वाजता महाआरती होईल. उत्सवाला सामाजिक जाणिवेची जोड देत सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत भक्तांसाठी मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता महाप्रसादाचे वाटप केले जाईल. कष्टभंजन वीर हनुमान मित्र मंडळ, जय हिंद मित्र मंडळ आणि जय हिंद नवशक्ती महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---