Hanuman Jayanti 2025 : रिधूर (ता. जळगाव) येथील तापी नदीच्या काठावर असलेले अवचित हनुमानाचे पुरातन मंदिर आपल्या वैशिष्ट्यांमुळे ओळखले जाते. आतापर्यंत हनुमानाची मूर्ती दगड किंवा पीओपीपासून साकारण्यात आलेली असते, मात्र भाविकांनी नवसापोटी अर्पण केलेल्या लोण्यातून साकारण्यात आलेली हनुमानाची 8 फुटाची मुर्ती संपूर्ण विश्वात येथेच पाहण्यास मिळेल. विशेष म्हणजे उन्हाळ्यात देखील मूर्तीवरील लोणी वितळत नाही. उंच गाभारा असलेल्या मंदिरासह येथे भव्य सभामंडपही असून ‘भक्तांच्या श्रद्धेचं पवित्र तीर्थक्षेत्र ‘अवचित हनुमान’ नवसाला नक्कीच पावणारा आहे’, ही श्रद्धा भक्तांमध्ये दिवसांगणिक वाढत आहे.
स्वयंभू मुर्ती
अवचित हनुमान मंदिरालगत कधीकाळी खूप मोठे वडाचे झाड होते. त्याखाली आजूबाजूच्या परिसरातील गुराखी त्यांची जनावरे चारण्यासाठी येत आणि येथेच झाडाखाली थोडी विश्रांती घेत असत. अशात एका गुराख्याला स्वप्न पडले, की वडाच्या झाडाखाली एक हनुमानाची स्वयंभू मूर्ती आहे. जमीन खोदून मूर्ती वर काढल्यावर तिची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर गावाचे कल्याण होईल, असा दृष्टांत त्याला मिळाला. जवळपास सर्वच गुराख्यांना स्वप्नात तसा दृष्टांत मिळाल्यावर गावात चर्चा सुरू झाली. त्यादृष्टीने गावकर्यांनी वडाच्या झाडाखाली खोदकाम केले. पण गावातील मोठ्या जमीनदाराने त्यांचा तो प्रयत्न हाणून पाडला. मात्र, काही दिवसांनी जमिनदारालाही स्वप्नात हनुमानाचा दृष्टांत मिळाला. शेवटी सर्वांच्या प्रयत्नांनी जमिनीतून हनुमानाची मूर्ती बाहेर काढून तिची त्याच ठिकाणी बांधलेल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. अचानक प्रगटलेल्या हनुमानाला तेव्हापासून ‘अवचित हनुमान’ असे संबोधले जाऊ लागले.
लोण्याचा मारोती म्हणून ओळख
गावातील एका व्यक्तीकडे त्यांचे नातेवाईक मुक्कामाला थांबले. त्यांनी त्यांच्या दूध न देणारी म्हैस पूर्ववत दूध देऊ लागल्यावर तुला लोण्याचा नवस दाखवेल, असे बोलून त्यांनी अवचित हनुमानाला साकडे घातले. यानंतर हनुमानाचा चमत्कार म्हणावा की काय म्हणून त्यांच्या म्हशीने दुसर्याच दिवशी दूध दिले. यानंतर सदर व्यक्तीने लोण्याचा गोळा घेऊन हनुमानाच्या मंदिरावर येण्यासाठी निघाले. मात्र येताना त्यांना अंधार झाल्याने सकाळी नवस फेडण्याच्या विचाराने लोण्याचे भांडे छताला टांगून त्यादिवशी नातेवाईकांकडेच मुक्काम केला. त्याच रात्री ज्यांच्याकडे ते मुक्कामी थांबले होते त्यांच्या घराला अचानक आग लागली. आगीत सगळे काही जळून खाक झाले. पण लोण्याचे छताला टांगलेले मडके जशास तसे राहिले. नंतर त्यातील लोणी अवचित हनुमानाला नवस फेडण्यासाठी अर्पण करण्यात आले. तेव्हापासून प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला अवचित हनुमानाच्या मूर्तीस लोणी चढविण्याची प्रथा सुरू झाली. ती आजतागायत सुरू आहे.
लोणी वितळत नाही
लोण्यापासून साकारलेल्या मारोतीच्या मुर्तीवर दरवर्षी लोणी लावले जाते. मुर्ती लोण्याची असली तर त्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम जाणवून येत नाही. विशेष म्हणजे उन्हाळ्यात जळगाव जिल्ह्यातील तापमान हे 43 ते 45 अंश सेल्सिअसच्या जवळ कायम असते. या तिव्र उन्हाच्या झळांमध्ये देखील मुर्तीवरील लोणी वितळत नाही.
11 व 12 एप्रिल रोजी मंदिर पूर्णवेळ सुरु राहणार
यंदा हनुमान जन्मोत्सवानिमित्त ‘अवचित हनुमान’ येथे दि. 3 एप्रिल ते 9 एप्रिल या दरम्यान स्व.महंत श्री.माधवदासजी महाराज यांच्या आशीर्वादाने श्रीमद्भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार, दि. 9 एप्रिल रोजी कथेची सांगता होऊन पंचक्रोशीतील भक्तांच्या उपस्थितीत श्रीमद्भागवत कथा उत्साहात संपन्न झाली, असे सिद्धपीठ श्री अवचित हनुमान मंदिर – रिधुर, ता.जि. जळगाव चे महंत श्री 108 श्री दिपकदासजी महाराज यांनी सांगितले.
शनिवार, 12 एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे. याअनुषंगाने दरवर्षीप्रमाणे ‘अवचित हनुमान’ येथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. हनुमान जन्मोत्सवला शुक्रवार, दि. 11 एप्रिल रोजी रात्री 10 वाजेपासून सुरूवात होऊन रात्री 12 वाजेनंतर अवचित हनुमान महाराजांच्या मुर्तीला महाअभिषेक करुन ‘सिंदूर चोला’ चढविला जाईल. शनिवार, दि. 12 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता महापूजा व महाआरती होणार आहे. महाआरती पश्चात भाविकांना महाप्रसाद दिले जाईल. यानिमित्ताने दि. 11 व 12 एप्रिल अर्थात शुक्रवार व शनिवार असे दोन्ही दिवस मंदिर पूर्णवेळ भक्तांसाठी सुरु असून दिवसभर व रात्री उशिरापर्यंत भक्त-भाविक दर्शनाचा लाभ घेऊ शकतात. दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा ‘हनुमान जयंती’ला मोठ्या संख्येने भक्त परिवार हा वाढूनच राहील, असा विश्वास ‘अवचित हनुमान’ येथील महंत श्री.दीपकदास महाराज यांनी दर्शविला आहे.