चोपडा : तालुक्यातील हातेड खुर्द ग्राम पंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या आदेशाला केराची टोपली दाखविली असून, यामुळे प्लॉट मिळण्यास विलंब होत असल्याची तक्रार ९३ लाभार्थीनी केली आहे. दरम्यान, अवघ्या पाच जणांपर्यंत आदेशाची प्रत पोहोचली आहे. या शासकीय जागेवर अतिक्रमण झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
हातेड खुर्द येथे गट क्रमांक सहापैकी क्षेत्र दोन हेक्टर ५७ आर गावठाण विस्तार क्षेत्रात ९३ लाभार्थीचे प्लॉट पाडण्यात आले आहेत. ५० बाय ३० चौरस फ ट आकाराचे हे सर्व सारखे प्लॉट वितरित करून ते संबंधित लाभार्थीना द्यावेत, असा आदेश ४ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूलच्या तहसीलदार ज्योती गुंजाळ यांनी अमळनेरचे उपविभागीय अधिकारी, चोपड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी व भूमी अभिलेखच्या उपाधीक्षकांना काढला. आदेश काढून तो संबंधितांनी हातेड खुर्द येथील ग्रामपंचायतीला बजावला.
मात्र, या आदेशाला न जुमता अतिक्रमणधारकांच्या मर्जीखातर ग्रामसेवक व संबंधितांनी केराची टोपली दाखविली, असा आरोप लेखी स्वरूपात करण्यात आला आहे. लोटन संतोष पाटील व इतर पाच जणांना याची प्रत मिळाली असून, सर्व ९३ लाभार्थी मोजणीपासून वंचित राहिले आहेत; जी जागा मोजणी करणार आहेत, तेथे साहेबराव पाटील, अनंत संभाजी पाटील, सुभाष यादव पाटील, प्रभाकर शहादू पाटील व शरद शाहू पाटील यांनी अतिक्रमण केले आहे.
तात्पुरत्या निवाऱ्याची सोय शेड उभारून या प्लॉटवर कच्चे अतिक्रमण असून, ते काढून ग्रामपंचायतीने संबंधितांना निर्धारित मापाचे प्लॉट वितरित केले पाहिजेत, अशी मागणी संभाजी साहेबराव बाविस्कर, श्रीराम यादव पाटील, सुशीला कपिलचंद बोरा, साहेबराव सीताराम बोरसे आदी ९३ जणांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. शासनाने या जागेवरील ग्राम पंचायतीच्या माध्यमातून अतिक्रमण काढावे व लाभार्थीना रीतसर प्लॉट मोजणी करून वाटप करावे, अशी मागणी केली आहे.