पाचोरा : शहरातील किरण मोरे (वय २७) या तरुणाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागून अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी, ११ रोजी घडली. किरणच्या मृत्यूचा त्याच्या काकू उषाबाई मन्नु सोनार (वय ४०) यांना मोठा धक्का बसला. आक्रोश करत असताना काकूला तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात हलवत असताना काकूनेही प्राण सोडले. शहरात एकाच दिवशी पुतण्या आणि काकूची एकत्र अंत्ययात्रा निघाल्याने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाचोरा शहरातील हनुमान नगर भागातील रहिवाशी दादाभाऊ मोरे आणि त्यांच्या दोन्ही भावांचे कुटुंब एकाच ठिकाणी वास्तव्यास आहे. ११ रोजी दादाभाऊ मोरे हे यांचे काकाच्या उत्तरकार्यासाठी वरखेडी तालुका पाचोरा येथे गेले होते. उत्तरकार्य आटोपून आल्यानंतर त्यांचा लहान मुलगा किरण मोरे हा कामानिमित्त शहरातील दुसर्या भागाकडे जात असताना पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे लाईन क्रॉस करत असताना मुंबईहुन जळगावच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव रेल्वेचा धक्का लागल्याने किरण सोनार यांचा जागीच मृत्यू झाला. किरणच्या मृत्युची बातमी त्याच्या कुटुंबीयांना कळताच सर्वांनी एकच आक्रोश केला. आक्रोश करत असताना किरणची काकु उषाबाई मन्नु सोनार यांना तीव्र ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना शहरातील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. यानंतर पुढील उपचारासाठी जळगावला हलवत असतांना वाटेतच उषाबाई यांची प्राणज्योत मालवली. आज गुरुवारी सकाळी १० वाजता काकू आणि पुतण्या अशा दोघांची एकाच ट्रॅक्टरवर अंतयात्रा काढण्यात आली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल मोरे, पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र नरवाडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन किरण सोनार यांचा मृतदेह रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सचिन निकम हे करत आहे.