जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी “ह्यूमन मेटा न्युमो व्हायरस” (एच.एम.पी.व्ही) विषयी माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, एच.एम.पी.व्ही हा नवीन आजार नसून हा आजार 2001 पासून प्रचलित आहे. हा सौम्य स्वरूपाचा हंगामी आजार आहे, जो सर्दी आणि खोकल्यासारखे लक्षण असतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नसल्याचे ‘तरुण भारत लाईव्ह’ सोबत त्यांनी सांगितले.
डॉ. गायकवाड यांनी पुढे सांगितले की, या विषाणूची सक्रियता हिवाळ्यात अधिक असते, आणि विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना याचा धोका जास्त असतो. तथापि, सध्या भारतात श्वसन संसर्गाच्या प्रकरणांमध्ये कोणतीही लक्षणीय वाढ नसल्याने परिस्थिती चिंताजनक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. गायकवाड यांनी हे देखील स्पष्ट केले की, एच.एम.पी.व्ही हा सौम्य आजार आहे आणि इन्फ्लूएंझा किंवा आर.एस.व्ही (Respiratory Syncytial Virus) सारखा आहे. यासाठी विशिष्ट लस किंवा अँटीव्हायरल औषध सध्या उपलब्ध नसून यावरील उपचार लक्षणांवर आधारित केले जातात.
एच.एम.पी.व्ही. रुग्ण आढळ्यास त्यांच्यासाठी स्पेशल वॉर्ड सज्ज ठेवण्यात आला आहे. या वॉर्डमध्ये लहान मुलांसाठी वेगवेगळे कार्टून रेखाटण्यात आले आहेत, जेणे करुन रुग्णांना शारीरिकसह मानसिक स्वास्थ लाभणार आहे.
त्यांनी श्वसन संसर्ग टाळण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत:
खोकताना किंवा शिंकताना तोंड व नाक रुमाल किंवा टिश्यूने झाकावे.
वारंवार हात धुणे आणि सॅनिटायझरचा वापर करावा.
ताप, खोकला किंवा सर्दी असल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे.
आजारी व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळावा.
गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे.
घरातील आणि सार्वजनिक ठिकाणची हवा खेळती राहील याची खात्री करावी.
भरपूर पाणी प्यावे आणि पोषक आहार घ्यावा.
डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार हात लावणे टाळावे.
हे सर्व उपाय श्वसन संसर्ग टाळण्यास मदत करू शकतात आणि नागरिकांनी हे पाळण्याचे महत्त्वाचे असल्याचे डॉ. गायकवाड यांनी स्पष्ट केले.