बस आणि ट्रकचा भीषण अपघात, अपघातानंतर दोन्ही वाहनांनी घेतला पेट; 14 जण जिवंत जळाले….!

---Advertisement---

 

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आणि संपूर्ण परिसर हादरून गेला… सकाळी साधारण साडेसहा वाजण्याच्या सुमारास प्रवाशांनी भरलेली एक बस आपल्या मार्गावर जात होती. बसमध्ये सुमारे 35 प्रवासी प्रवास करत होते. अचानक एका दगडखाणीजवळ ही बस समोरून येणाऱ्या खडीने भरलेल्या ट्रकवर जोरात आदळली.

धडक इतकी भीषण होती की, अपघातानंतर काही क्षणांतच दोन्ही वाहनांनी पेट घेतला. आगीच्या ज्वाळांनी बस पूर्णपणे वेढली गेली आणि आत बसलेले प्रवासी अडकून पडले… काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत बसमधून उड्या मारून जीव वाचवला. मात्र अनेक प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. विशेषतः बसच्या मागील भागात बसलेले प्रवासी आगीत अडकले.

या भीषण घटनेत आतापर्यंत 14 जणांचा जिवंत जळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर सुमारे 15 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य तात्काळ सुरू करण्यात आले. काही मृतदेह अजूनही बसमध्ये अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत, यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलली आहेत… ही घटना केवळ अपघात नसून, अनेक कुटुंबांसाठी आयुष्यभराची वेदना बनली आहे…

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---