Manmohan Singh Passes Away : डॉ.मनमोहन सिंग यांनी देशाचे १४ वे पंतप्रधान म्हणून काम पहिले आहे. त्यांना आर्थिक सुधारणांचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. त्यांनी पंतप्रधान म्हणून २२ मे २००४ रोजी शपथ घेत २६ मे २०१४ पर्यंत दोन टर्म पूर्ण केले. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारचे नेतृत्व करताना, त्यांनी एकूण ३ हजार ६५६ दिवस पंतप्रधान म्हणून कामकाज केले. ते भारताच्या इतिहासातील तिसरे सर्वात जास्त काळ काम करणारे पंतप्रधान बनले.
तत्पूर्वी फक्त जवाहरलाल नेहरू (६,१३० दिवस) आणि इंदिरा गांधी (५,८२९ दिवस) कामकाज पहिले आहे. ते सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले . इंदिरा गांधींच्या कार्यकाळात १९७१ मध्ये परराष्ट्र व्यापार मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी आपला प्रवास सुरू केला. १९७२ मध्ये ते वित्त मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार बनले, हे पद त्यांनी १९७६ पर्यंत सांभाळले.
।
१९५७ ते १९९१ पर्यंत, ते अनेक विद्यापीठांमध्ये प्राध्यापक होते आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये काम केले. ते भारत सरकारचे आर्थिक सल्लागार होते, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पद भूषवले होते, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते आणि UGC चे अध्यक्ष देखील होते.
१९९१ मध्ये भारत आर्थिक संकटातून जात असताना त्यांना अर्थमंत्री बनवण्यात आले. सिंग यांनी रुपयाचे अवमूल्यन केले, कर कमी केले, सरकारी उद्योगांचे खाजगीकरण केले आणि परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल घडले. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते आणि १९९१ मध्ये राज्यसभेवर दाखल झाले. सिंग १९९६ पर्यंत अर्थमंत्री राहिले, पण १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
२००४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने भारतीय जनता पक्षाचा (भाजप) पराभव केला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद नाकारत सिंग यांची पंतप्रधानपदासाठी निवड केली. सिंग यांनी सरकार स्थापन करून पदभार स्वीकारला. भारतातील गरीबांची स्थिती सुधारणे, पाकिस्तानबरोबर शांतता प्रस्थापित करणे आणि विविध धार्मिक समुदायांमधील संबंध सुधारणे ही त्यांची मुख्य उद्दिष्टे होती.
मे २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसने आपल्या जागांची संख्या वाढवली आणि सिंग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले. तथापि, भारताच्या आर्थिक विकासातील मंदी आणि काँग्रेस नेत्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये सरकारच्या लोकप्रियतेवर परिणाम झाला. २०१४ मध्ये सिंग यांनी जाहीर केले की ते तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा प्रयत्न करणार नाहीत आणि नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली त्याच दिवशी २६ मे रोजी त्यांनी पद सोडले.