नंदुरबार : देव दर्शन करुन परतीचा प्रवास करणाऱ्या वाहनासमोर अचानक दुसरे वाहन आले. यामुळे चालकाचा ताबा सुटून वाहन रस्त्याच्या बाजूला आदळले. सुदैवाने हे वाहन शेकडो फूट खोल दरीत पडण्यापासून थोडक्यात वाचले. या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत.
तळोदा तालुक्यातील करडे येथील काही तरुण अस्तंबा यात्रा दर्शन गेले होते. ते दर्शन घेऊन (क्र. टाटा एस. क्र. MH- २८ AB- १२६५) या वाहनाने घरी परत येत होते. कठोरा गावाजवळ भाविकांच्या या वाहनासमोर अचानक दुसरे वाहन आले. यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन रस्त्याच्या कडेस जाऊन ठोकले गेले. यामुळे सर्व प्रवासी फेकले जाऊन जखमी झाले. यात हर्षल किरण ठाकरे, किरण विजेसिंग पाडवी, मुन्ना जहाग्या पाडवी, अर्पण अभिमन्यु पाडवी, मुकेश सरुपसिंग रावताळे,यहान करमसिंग पाडवी अभिमन्यु विजेसिंग पाडवी, प्रशांत करण पाडवी, शेखर दिलीप पवार, प्रविण अशोक वळवी, अजय सुरूपसिंग रावताळे, राहुल सुकलाल पवार, राजदिप किरण पाडवी, यशवंत अभिमन्यु पाडवी या प्रवाशांचा समावेश आहे.
या अपघातातील काही जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे तातडीने हलविण्यात आले. तसेच काही जखमींना नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी गणेश संजय नवरत्न (वय- २३ धंदा- मजुरी रा. करडे ता. तळोदा जि. नंदुरबार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक नामे रमेश उदेसिंग राहते रा. करडे याने त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने चालवुन अपघात करुन वरील लोकांना दुखापतीस कारणीभुत झाला व स्वतःच्या वाहनाच्या नुकसानीस कारणीभुत झाला म्हणुन गुन्हा नोंदवण्यात आला. पो. ठाणे प्रभारी अधिकारी सपोनि राजु लोखंडे अधिक तपास करीत आहेत.