छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. छावा चित्रपटात दाखवलेल्या ऐतिहासिक प्रसंगांचा प्रभाव नागरिकांवर मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. चित्रपट पाहिल्यानंतर मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील असीरगड गावातून बातमी समोर येत आहे. यागावातील शेतात मुघलकालीन सोन्याची नाणी सापडल्याची अफवा पसरली. या अफवेनंतर महिला, पुरुष, वृद्ध, लहान मुले यांच्यासह शेकडो लोक मशाल आणि आधुनिक उपकरणे घेऊन शेतात खोदण्यासाठी रात्री शेतात पोहोचले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बुरहानपूरच्या असीरगड किल्ल्याच्या आसपास सोने-चांदीच्या नाण्यांचा खजिना असल्याची अफवा पसरल्यानंतर लोकांनी मोठ्या संख्येने येथे गर्दी केली. काही दिवसांपूर्वी शेतात काम करणाऱ्या काही मजुरांना मातीमध्ये सोन्याची नाणी आढळल्याचा दावा केला गेला. त्यानंतर ही अफवा वेगाने पसरली आणि स्थानिक गावकरी तसेच इतर भागातील नागरिकही या भागात येऊन खोदकाम करू लागले.
नेमकं काय घडलं?
बुऱ्हाणपूर शहरापासून 18 किमीवर असीरगड किल्ल्याजवळून राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यासाठी खोदकाम सुरू आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी एका बांधकाम कंपनीने खोदलेली माती ही एका व्यक्तीच्या शेतात टाकली होती. त्यात काही कामगारांना धातुची नाणी सापडली. तर अनेकांनी छावा चित्रपटातील बुऱ्हाणपूर लुटीचा संदर्भ देत या ठिकाणी औरंगजेबाचा खजिना दडल्याची अफवा पसरवली. हा खजिना काढण्यासाठी असिरगड येथीलच नाही तर आजुबाजूच्या लोकांनी किल्ला परिसर आणि राष्ट्रीय महामार्गा लगतच्या शेतात खोदकाम सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.
इतिहासकारांच्या मते, बुरहानपूर हे मुघल सैन्याचे मुख्य ठिकाण होते. युद्धातून परतलेल्या सैनिकांनी लुटलेला खजिना सुरक्षित ठेवण्यासाठी जमिनीत गाडून ठेवत असत. काही ठिकाणी पूर्वीही अशा प्रकारचे नाणे सापडल्याची नोंद आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर मुघलकालीन संपत्ती असल्याची शक्यता व्यक्त केली जाते.