जळगाव : ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत जळगाव केंद्रातून नाट्यरंग बहुउद्देशीय संस्था, जळगाव या संस्थेच्या हम दो NO या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या नाटकाची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २४ नोव्हेंबर ते १० डिसेंबर दरम्यान छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे जळगाव केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव या संस्थेच्या मजार या नाटकास द्वितीय पारितोषिक उत्कर्ष कलाविष्कार संस्था, भुसावळ या संस्थेच्या उभ्या पिकातलं ढोरं या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.
वैयक्तिक पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक उम्मार मोकाशी (नाटक-हम दो NO) व प्रेरणा देशमुख (नाटक- उभ्या पिकातलं ढोरं ), दिग्दर्शन: प्रथम पारितोषिक अपुर्वा कुलकर्णी ( नाटक – हम दो NO), द्वितीय पारितोषिक वैभव मावळे (नाटक-मजार), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक प्रथम तायडे (नाटक- मजार), द्वितीय पारितोषिक लीना तडवी (नाटक-चांदणी), नेपथ्य : प्रथम पारितोषिक दिशा ठाकूर (नाटक- हम दो NO,) द्वितीय पारितोषिक रोशन वाघ (नाटक- गोदो वन्स अगेन), रंगभूषा : प्रथम पारितोषिक संजय निकुंभ (नाटक- होय, हे हिंदू राष्ट्र आहे), द्वितीय पारितोषिक उज्वला पाटील (नाटक- विठ्ठला), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे योजना दिघे (नाटक- थेंब थेंब आभाळ), शुभांगी वाडीले (नाटक – म्याडम ), नेहा पवार ( नाटक- हम दो NO), विशाखा सपकाळे (नाटक- ती), ज्योती पाटील (नाटक- मजार), शुभम गुडा (नाटक- गोदो वन्स अगेन), गजानन चौधरी (नाटक- मजार), कुंदन तावडे (नाटक- उभ्या पिकातलं ढोरं), गणेश सोनार (नाटक-होय, हे हिंदू राष्ट्र आहे) सुमीत राठोड (नाटक- जुगाड)
या स्पर्धेत एकूण १४ नाट्य प्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सुभाष भागवत, सुरेश बारसे आणि ज्योती निसळ यांनी काम पाहिले होते. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केलेले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रथम आलेल्या नाटकाच्या संघाचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.