---Advertisement---
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी निधनाला चार दिवस होत नाहीत, तोच राष्ट्रवादी काँग्रेसमधील हालचालींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदी विराजमान होणार आहेत.
आज दुपारी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड एकमताने झाली असून आज संध्याकाळी त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या एका ट्विटने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये बारामतीच्या राजकीय इतिहासाचा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे सध्याच्या सत्तेच्या घाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं बोललं जात आहे.
रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की,
बारामतीचं दुसरं नाव म्हणजे आदरणीय साहेब आणि अजितदादा…! आजपर्यंत या दोघांपैकी ज्याला सत्तेचं पद मिळायचं त्यांच्या अभिनंदनाचे बारामतीत मोठमोठे बॅनर दिसायचे… त्यावर #उपमुख्यमंत्रीपदी निवड किंवा #भावी_मुख्यमंत्री अशा ठसठशीत अक्षरात अजितदादांचा देखणा आणि राजबिंडा फोटो असायचा. ते पाहून मन आनंदाने भरुन यायचं आणि अभिमानही वाटायचा… पण आज?, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांच्या शेवटच्या वाक्याने सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे. रोहित यांचा हा टोमणा कुणाला आहे? असा सवाल केला जात आहे.
आमदार रोहित पवार यांच्या “पण आज?” या शब्दामुळे अनेक तर्कवितर्कांना लावले जात आहे. हा टोमणा नेमका कुणासाठी होता? सत्तेच्या घाईवर भाष्य होतं की राजकीय संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित केला जातोय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
एकीकडे शरद पवार गटाकडून दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत वक्तव्यं होत असताना, अजित पवार गटाकडून मात्र अशा कोणत्याही चर्चेला पूर्णविराम देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांचं ट्विट अधिकच महत्त्वाचं ठरत आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर सुरू झालेल्या या राजकीय घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उघडपणे समोर आला असून, पुढील काही तासांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.









