जळगाव बाजार समितीत भरडधान्याची आवक वाढली, बाजारभाव तेजीत

जळगाव : जिल्ह्यात खरीप-रब्बी हंगामातील शेतपिकांचे भरडधान्य उत्पादनाची आवक स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत वाढली आहे. दरदिवशी सरासरी ३५ ते ९५ क्विंटल ज्वारी, तुर, हरबरा, उडीद, सोयाबीन आदी भरडधान्याची भरडधान्याची आवक या सप्ताहात बर्‍यापैकी असून दर देखील तेजीत असल्याचे दिसून आले आहे.

पांढरे सोने उत्पादनात अग्रेसर असलेल्या जळगाव जिल्ह्याची ख्याती आहे. गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी ११ ते १४ हजार रूपये क्विंटलपर्यत दर असलेल्या कापसाला सद्यास्थितीत६ ते ७ हजार रूपये प्रति क्विंटल दर खाजगी व्यापार्‍यांकडून दिला जात आहे.
कापूस उत्पादनासोबतच भरडधान्य उत्पादनात देखील जिल्हा अग्रेसर असून सद्यस्थितीत स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भरडधान्याची आवक बर्‍यापैकी आहे. या सप्ताहात सोमवार ते गुरूवार पर्यत दरदिवशी सरासरी ३५ ते ९५ क्विंटल ज्वारी (दादर), तूर, हरबरा, सोयाबीन आदी भरडधान्याची आवक झाली आहे. तर शेतीउत्पादनाचे बाजार भाव देखील बर्‍यापैकी आहेत.

आवकेसोबतच दर तेजीत
या सप्ताहात तुरीची आवक ९५ क्विंंटल असून ६६०० ते ६७०० रूपये प्रतिक्विंटल आजचे दर आहेत. सोयाबीनची आवक ३४ ते ९६क्विंटल असून ५२७० ते ५५७५ रूपये प्रति क्विंटल आहेत. ज्वारीची आवक सरासरी तीन ते पाच क्विंटल असून ३३०० ते ३४०० रूपये प्रति क्विंटल आहेत. ज्वारी प्रमाणेच हरबरा उत्पादनाची आवक कमी असून सर्वात जास्त दर ११ हजार रूपये प्रति क्विंटल दर मिळाले असल्याचे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने म्हटले आहे.