जळगाव : जून महिना संपला अन् जुलै महिन्यास सुरूवात झाली. मात्र समाधानकारक पाऊस नसल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट गडद होतांना दिसत आहे. जिल्ह्यात सध्या 7 तालुक्यातील 30 गावांमध्ये 35 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जुलै महिन्यात पाऊस लांबल्यास पाणी टंचाईची तीव्रता अजून वाढणार आहे. चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक 13 गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने टंचाईची तीव्रता ऐन पावसाळ्यात वाढणार आहे. जून महिन्याच्या सुरूवातीला आणि जुलै महिन्याच्या सुरवातीला चांगला पाऊस होईल. जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र अल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे पाणीटंचाई समस्या दिवसेंदिवस वाढत असून अजून टँकरमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यासाठी टंचाई आराखड्याप्रमाणे जिल्हाभरात यासंदर्भात उपाययोजना सुरू आहेत. जिल्ह्यात अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. त्याअनुषंगाने जि.प.च्या ग्रामिण पाणीपुरवठा विभागाने सुधारीत टंचाई आराखडा तयार केला होता. त्यास जिल्हा प्रशासनाकडून मंजुरीही देण्यात येऊन टंचाईसंदभार्त उपायोजना करण्यात आल्या आहेत.
जुलै महिन्यातही टंचाईच्या झळा.
पावसाळा सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटला तरी वरूणराजाची जिल्ह्यावर कृपा होत नसल्याने पाणीटंचाईची स्थितीही गंभीर रुप धारण करीत आहे.
एकट्या चाळीसगाव तालुक्यात सर्वांत जास्त 13 गावांची टॅकरव्दारे तहान भागविली जात आहे. त्यानंतर जामनेर तालुक्यात 8 गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे पाचोरा तालुक्यात 6 तर भुसावळ 3, भडगाव 2, पारोळा 2, बोदवड तालुक्यात एका गावात टँकरने पाणी दिले जात आहे.