जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठानातर्फे प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी देखील रंगतरंग या सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म त्रिशताब्दी वर्ष आहे म्हणूनच सामाजिक आणि सांस्कृतिक उत्थानाचे केंद्रबिंदू असलेल्या संत परंपरेचा अनुभव या कार्यक्रमातून मिळणात आहे. यानिमित्ताने संत परंपरा या चार दिवसीय महानाट्यातील पहिले पुष्प गुरुवारी जगद्गुरू श्री संत तुकाराम(तुका झालासे कळस)ने प्रारंभ झाला.
विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ. अविनाश आचार्य विद्यालय पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाने आजच्या दुसऱ्या पुष्पात संत एकनाथ व संत गाडगे महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रसंग व नृत्याचे सादरीकरण केले. यात संत एकनाथांचे अभंग, ओवी, गीत, तसेच गाडगे महाराज यांच्या जीवनातील प्रसंग, स्वछतेचा संदेश यातून देण्यात आला.वाघ्या मुरळी, गोंधळ, दिंडी, अहिल्यादेवी यांचा पोवाडा, गवळण, इ गीतांचे सादरीकरण करण्यात आले. यात संत परंपरा या थीमवर भक्त वेडा भगवंत हे उत्साहात संपन्न झाले.
पूर्व प्राथमिक विभागाची कार्यक्रमाची सुरुवात ही श्रीरामदास स्वामी लिखित सुखकर्ता दुखहर्ता या आरतीने होऊन पंढरीचा पांडुरंग नाचू लागला, तुळस हिरवीगार ठकडा रुपेश सुंदर अशा विविध गाणी सादर करत विठ्ठल नामाची शाळा भरवत भक्तीमय वातावरणात विठ्ठलाचा जयजयकार केला गेला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. सुमारे सातशे विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून द्वारका उद्योग समूहाचे प्रमुख भास्कर बोरोले, माधवराव गोळवलकर रक्तपेढीचे डॉ. चौधरी, माजी विद्यार्थी डॉ.तुषार चौधरी, विवेकानंद प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा हेमलता अमळकर, सचिव विनोद पाटील, कोषाध्यक्ष्या डॉ. पल्लवी मयूर, माजी अध्यक्षा शोभाताई पाटील,सदस्य कुशल गांधी, मुख्याध्यापिका योगीता शिंपी, कल्पना बावस्कर, समन्वयिका रोहिणी कुलकर्णी, सिमा पाटील यांची उपस्थिती होती .या कार्यक्रमासाठी रंगतरंग प्रमुख योगेश पाटील यांनी नियोजन केले.